Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक महापौर – उपमहापौर पदाचा आज फैसला; प्रशासनाची तयारी पुर्ण

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकचा महापौर – उपमहापौर कोण ? याचा फैसला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सत्ताधारी भाजपा आणि महाशिवआघाडी यांच्याकडुन विजयाचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी विजयासाठी लागणारा आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपाची कसोटी लागलेली असतांनाच महाआघाडीची मोटी बांधतांना सेनेला नाकेनऊ येत आहे. भाजपाचे नऊ नगरसेवक फुटले असले तरी, राजकिय आजाराबरोबर खर्‍या आजारामुळे उपस्थितीवर असलेले सावट आणि सभागृहात उपस्थित राहुन तटस्थची भूमिकेची चर्चा यामुळे महापौर पदाच्या निकालाबाबत मोठी उत्कंठा लागली आहे.

महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपाकडे ६५ नगरसेवक असुन शिवसेना ३४ – आरपीआय १(नोंदणीमुळे संलग्न), राष्ट्रवादी कॉग्रेस ६ – अपक्ष १ (संलग्न), कॉग्रेस ६ – अपक्ष १(संलग्न), मनसेना ५ – अपक्ष १ (संलग्न) असे पक्षीय बलाबल आहे. यात महाशिवआघाडीत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मनसेनेसह दोन्ही कॉग्रेस व तीन अपक्ष एकत्र आल्यास हा आकडा ५५ पर्यत जातो. भाजपातून 9 नगरसेवक फोडण्यात शिवसेनाला यश आले असल्याने आता महाशिवआघाडीचा आकडा ६४ पर्यत गेला आहे. हा आकडा ६७ पर्यत जाणार असल्याचा दावा सेनेकडुन करण्यात आला आहे.

प्रत्यक्षात बहुमतासाठी ६१ नगरसेवकांची गरज आहे. महाशिवआघाडीचे नेतृत्व करीत असलेल्या बाळासाहेब सानप यांनी भाजपातून 9 नगरसेवक फोडल्याचे उमेदवारी अर्ज दाखल करतांना समोर आले आहे. परिणामी भाजपा आकडा ५६ पर्यत खाली गेला आहे. यामुळे आता भाजपाकडुन महाशिवआघाडीत असलेले अपक्ष व मनसेना यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहे. यास यश आल्याचा दावा सत्ताधारी भाजपाने केला आहे. अशाप्रकारे आकड्याची जुळवाजुळवा करण्यात सर्वच पक्षांचे नेते व पदाधिकारी कामाला लागले आहे. सहलीसाठी गेलेले सर्वच पक्षांचे नगरसेवक इगतपुरी आणि नाशिक शहरात हॉटेलवर येऊन थांबले असुन आज  (दि.२२) ते एकत्रीतपणे थेट सभागृहात सकाळी ११ वाजेच्या अगोदर येऊन पोहचणार आहे.

महापालिका सभागृहात आज  सकाळी ११ वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षसेखाली महापौर व उपमहापौर निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. यात महापौर पदासाठी ११ आणि उपमहांपौर पदाकरिता १० उमेदवारी अर्ज दाखल झालेले असल्याने सभागृहात निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासन अधिकारी हे कायदेशीरपणे निवडणूक प्रक्रिया पार पडणार असुन सुमारे दुपारी एक वाजेच्या सुमारास महापौर पदाचा निकालाचे काम संपणार आहे. या निवडणुक प्रक्रियेची संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. मुख्यालयात ओळखपत्रशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नसून संपुर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या व्यवस्थेची जिल्हाधिकारी प्रशासन व शहर पोलिसांनी आज सायंकाळी पाहणी केली.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!