Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिवसेनेकडे महापौर, उपमहापौर होण्याइतके संख्याबळ ः चौधरी

Share

नाशिक । प्रतिनिधी

शिवसेना नेत्यांकडून आलेल्या आदेशानुसार  चार नगरसेवकांचे महापौर पदासाठी व एक उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. आम्हाला बहुमतासाठी लागणार्‍या ६१ आकड्यापेक्षा जास्त नगरसेवक असल्याने महापौर, उपमहापौर शिवसेनेचाच होणार, असा विश्वास आज शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला. दरम्यान, मनसेना ही भाजपसोबत जाणार या वृत्ताचे चौधरी यांनी खंडन केले.

महापालिकेत काल  महापौर, उपमहापौर पदाचे अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने सकाळपासून सेना जिल्हासंपर्क प्रमुख चौधरी, माजी आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्यासह पदाधिकारी महापालिकेत ठाण मांडून होते. यावेळी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली.

पक्षाने सांगितल्याप्रमाणे आज आम्ही महापौर पदासाठी अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर व विलास शिंदे यांचा आणि उपमहापौरपदासाठी विलास शिंदे यांचा अर्ज भरले. महापौर व उपमहापौर पदाच्या विजयासाठी लागणारा ६१ या आकड्यापुढे आम्हा सर्व पक्षांकडून समर्थन मिळाले आहे. यामुळे महापौर व उपमहापौर शिवसेनेचे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर पदासाठी अर्ज दाखल करतांना सेनेसोबत भाजपचे नगरसेवक उपस्थित होते, सेनेसोबत नेमके किती नगरसेवक आहे? या प्रश्नाला उत्तर देतांना चौधरी यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार विजयी होण्यासाठी लागणारे संख्याबळ सेनेकडे असल्याचे सांगितले. मनसेना ही भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या असल्या तरी यात कोणतेही तथ्य नाही. आम्हाला ६१ मतांपेक्षा जास्त मते मिळणार असल्याने आमच्यासोबत किती पक्ष आहे, हे तुम्हीच समजून घ्या, असेही चौधरी यांनी सांगितले.

सानप समर्थकांचा आकडा उघड
शिवसेना खा. संजय राऊत यांच्यासोबत चर्चा करीत माजी आ. सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केल्या तेव्हाच महापालिकेवर सेनेचा भगवा फडकणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानुसार सानप यांच्याकडे सोबत १० ते १२ नगरसेवक असल्याची चर्चाही समोर आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी भाजपने 8 नगरसेवक संपर्कात नसल्याची कबुली दिली होती. मात्र, आज कमलेश बोडके हे सेनेसोबत गेल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपच्या तंबू बाहेर गेलेल्या नगरसेवकांची संख्या 9 झाली आहे. सेनेकडून हा आकडा अजून वाढणार असल्याने भाजपला सत्ता टिकाविणे अवघड जाणार आहे.

काँग्रेसला सत्तेत सहभाग हवा ः खैरे
महापालिकेत निर्माण होत असलेल्या महाशिवआघाडीत काँग्रेसचा समावेश असून त्यांच्याकडन सेनेला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमहापौरपदाचा अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी प्रसारमाद्यमांना प्रतिक्रिया दिली. मागील पंचवार्षिक काळात आम्ही मनसेनेला पाठिबा दिला होता. निवडणूक झाल्यानंतर आमच्याकडे कोणीही पाहत नाही. तेव्हा आता काँग्रेसला सत्तेत वाटा हवा असा आमचा हट्ट आहे. आम्हाला ठोस आश्वासन मिळाले पाहिजे, असे खैरे यांनी सांगितले.

मनसेनेकडून एकही अर्ज दाखल नाही
मनसेनेकडून उपमहापौरपदासाठी माजी स्थायी सभापती सलीम शेख यांनी अर्ज नेला असल्याने ते आज अर्ज दाखल करतील, अशी शक्यता होती. मात्र, शेख यांनी अर्जच दाखल केला नाही. भाजपने मंगळवारी मनसेनेच्या पदाधिकार्‍यासोबत चर्चा केली होती आणि मनसेनेकडून पाठींबा मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र, मनसेनेकडून अर्ज दाखल न झाल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहे.

बोरस्तेंच्या नावावर एकमताची शक्यता
महापालिकेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरपदाचा अर्ज दाखल केला आहे. बोरस्ते यांचा महापालिकेतील उपमहापौर म्हणून काम केल्याचा अनुभव, महानगरप्रमुख म्हणून काम करतांना दाखविलेले संघटन कौशल्य आणि थेट उद्धव ठाकरे यांच्याशी असलेला संपर्क यामुळे त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. तसेच खा. राऊत यांच्या संपर्कात असलेले सुधाकर बडगुजर, अनेक वर्षांपासून महिला आघाडी यशस्वीपणे सांभाळत असलेल्या सत्यभामा गाडेकर व धडपडणारा शिवसैनिक असलेले विलास शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. आता पक्षप्रमुख कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार यांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!