Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

निफाड मतदारसंघ – विधानसभा निवडणूक २०१९ : दोन कदमांसह बनकरांची प्रतिष्ठा पणाला

Share

निफाड । आनंदा जाधव

तीनही उमेदवारांच्या प्रचार रॅल्या, चौक सभा यांना मतदारांची गर्दी होत असून प्रत्येक उमेदवाराकडून कार्यकर्त्यांसाठी भोजनावळीची व्यवस्था केली जात असल्याने यावेळची निवडणूक कुणासाठीही सोपी नाही. एक मात्र निश्‍चित वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कांदा निर्यातबंदी अन् रस्त्यांची दुरवस्था या मुद्यांभोवतीच निफाडची निवडणूक फिरताना दिसत आहे. तीनही उमेदवारांकडून आश्‍वासनांचा पाऊस पाडला जात असून मतदार मात्र आपल्या मनाचा ठाव लागू देत नसल्याने उमेदवारांची धडकन वाढताना दिसत आहे.

निफाड विधानसभा मतदारसंघात प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असतानाच राष्ट्रवादीचे दिलीप बनकर, शिवसेनेचे अनिल कदम तर बहुजन विकास आघाडीचे यतीन कदम यांनी प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत चौकसभा, प्रचार रॅली आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचारात कोणतीही कसूर ठेवलेली नसतानाच शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक उमेदवारांना लक्ष्य केले जात असल्याने प्रचाराची दिशा काहीशी बदलल्याचे जाणवत आहे. त्यामुळे निफाडच्या रणसंग्रामात तीनही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून येथे धनुष्याचा बाण, शिट्टीचा आवाज की घड्याळाचा गजर होणार, याचीच चर्चा चवीने रंगवली जात आहे.

निफाड मतदारसंघात गत पाच वर्षांत बरीच उलथापालथ झाली आहे. प्रारंभी शिवसेना, भाजपत झालेली भरती अन् उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीत वाढलेले इनकमिंग तर तरुणांचा यतीन कदमांकडे वाढलेला कल यामुळे येथे आजी-माजी आमदारांसह यतीन कदमांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आमदार नानासाहेब पाटील, माजी आमदार माई कदम, ओझरच्या सरपंच जान्हवी कदम, चैताली बोरस्ते यांनी यतीन कदमांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेत गाव, वाडी, वस्ती पिंजून काढत मतांचा जोगवा मागितला आहे.

कोरी पाटी अन् स्व. आमदार रावसाहेब कदम यांचा वारसा, ओझर ग्रामपालिका आणि जि. प. सदस्य या माध्यमातून केलेले काम, दांडगा जनसंपर्क ही यतीन कदमांची जमेची बाजू आहे. तर गत दहा वर्षांपासून तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार अनिल कदम तिसर्‍यांदा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सेना-भाजप युतीची रसद, तालुक्यात केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू आहे, तर मागील वेळेस केवळ दुपारनंतर प्रचार यंत्रणा ढिल्ली केल्याने अल्प मतांनी झालेल्या पराभवाचे शल्य राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी, रिपाइं पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना सोबत घेत त्यांनी प्रचाराचा बार उडवून दिला असून आज तरी बनकरांचे पारडे वरचढ दिसत आहेत.

मागील वेळेस ओझरमधून कदमांना मिळालेल्या निर्णायक मतांमुळे विजयाचा मार्ग सुकर बनला होता. यावेळी मात्र आ. कदमांना घरातून यतीन कदमांचे आव्हान उभे ठाकले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात कोण कशी व्यूहरचना करणार, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

निफाड मतदारसंघावर एक नजर टाकली तर रस्त्यांची झालेली दुरवस्था, निसाकासह रासाका बंद, शासनाची फसलेली कर्जमाफी अन् कांदा निर्यातबंदी, बंद पडत असलेले उद्योगधंदे हे मुद्दे प्रचारात रान पेटवत असून माजी आमदार दिलीप बनकर व यतीन कदम यांचा रोख याच मुद्यांभोवती राहिला आहे. तर सोशल मीडियाद्वारे वैयक्तिक बाबीवर होणारा प्रचार हा आजी-माजी आमदारांसाठी काहीसा तापदायक ठरताना दिसत आहे. तीनही उमेदवारांच्या निर्णायक मतांवर एक नजर टाकली तर पिंपळगावसह गोदाकाठ भागातून माजी आमदार दिलीप बनकर सर्वाधिक मते घेतील. कारण मागील निवडणुकीतदेखील याच परिसराने बनकरांना साथ केली होती. ती यावेळी कायम राहील, असा अंदाज आहे.

तर मागील वेळी ओझरमधून एकगठ्ठा मते घेणारे आ. कदम यांना मात्र यावेळी ओझरऐवजी निफाड, सायखेडा या दोन गावांसह ग्रामीण भागातून मते मिळतील, तर यतीन कदम यांना ओझर, सुकेणा परिसरातून सर्वाधिक मतांचे दान मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे चित्र वरवर दिसत असले तरी मतदार मात्र ऐनवेळी काय करतील, याची खात्री नाही. त्यामुळे ही निवडणूक कुणासाठीही सोपी नाही.

निफाड मतदारसंघात १ लाख ४७ हजार १६२ पुरुष मतदार तर १ लाख ३० हजार ८९४ महिला मतदार असे एकूण २ लाख ७१ हजार ५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूणच यावेळीही आमदार कदमांच्या विजयाचा सुकर असणारा मार्ग यतीन कदमांच्या उमेदवारीने खडतर बनला असला तरी मागील वेळेस स्वतंत्र लढलेली भाजप यावेळी आ. कदमांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत असले तरी नाशिकमध्ये सेना-भाजपत झालेली बंडाळीची झळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार नाही ना अशी भीतीही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. असे असतानाच मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी दिलीप बनकर पूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरले असून त्यांनी आखलेली व्यूहरचना अन् कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी वाटून घेतलेले परिसर यामुळे बनकरांच्या विजयाचे हौसले बुलंद झाले आहेत.

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!