Friday, April 26, 2024
Homeनाशिकआंतरराष्ट्रीय व्यापार समीकरणांतून निर्माण होणाऱ्या संधींचा सकारात्मकतेने शोध घेणे आवश्यक – खा....

आंतरराष्ट्रीय व्यापार समीकरणांतून निर्माण होणाऱ्या संधींचा सकारात्मकतेने शोध घेणे आवश्यक – खा. हेमंत गोडसे

सातपूर । प्रतिनिधी

करोना संकटामुळे निर्माण झालेल्या आव्हानांसोबतच नंतरच्या काळात बदलत्या आंतरराष्ट्रीय व्यापार समीकरणांमुळे निर्माण होणाऱ्या संधींचा सकारात्मकतेने शोध घेणे आवश्यक आहे. नाशिक औद्योगिक क्षेत्रात मोठी क्षमता असून येथील उद्योजक निश्चित यादृष्टीने विचार करतील असे आवाहन खा. हेमंत गोडसे यांनी केले.

- Advertisement -

निमा इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेल तर्फे ‘करोना पश्चात उद्योगांसमोर उभी ठाकणारी आर्थिक आव्हाने’ या विषयावर वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी निमा हाऊस, सातपूर येथे खा. हेमंत गोडसे बोलत होते. त्यांच्या समवेत निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास आहेर, निमा आयएफसीचे समन्वयक परीक्षित जाधव, ज्येष्ठ उद्योजक जयप्रकाश जोशी यांची उपस्थिती होती.

यावेळी चर्चेदरम्यान कामगारांच्या सुरक्षेसोबतच उद्योजकांच्या सुरक्षेचादेखील विचार व्हावा, त्यांना सिक्युरिटी कव्हर मिळावे, उद्योजकांना लॉकडाऊनच्या काळातील ईएमआयमध्ये सूट मिळावी व उद्योग व्यवसाय टिकून राहतील यासाठी तरतूद करावी, मोठ्या उद्योगाकडे थकलेली लघु उद्योजकांची देणी लवकरात लवकर चुकती करण्यात यावीत, एमएसएमई क्षेत्राच्या लिक्विडीटी संबंधी समस्या दूर करण्यासाठी वर्किंग कॅपिटल पुरविण्यात यावेत अशी सूचना शासनाला व रिजर्व बँकेला खासदारांनी करावी, नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक क्लस्टरची निर्मिती व्हावी व यासाठी निधीची तरतूद व्हावी, लघु उद्योजकांना १ ते २% दराने २ ते १२ महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज उपलब्ध व्हावे, सेल्स टॅक्स रिफंड लवकरात लवकर मिळावेत, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मालाची मुंबईहुन येणाऱ्या वाहतुकीतील अडथळे दूर व्हावेत आदी बाबींकडे उपस्थित निमा पदाधिकारी व सहभागी उद्योजकांनी लक्ष केले

लॉकडाऊनच्या काळातील ईएमआय मध्ये सूट, सेल्स टॅक्स रिफंड, मोठ्या उद्योगाकडे थकलेली लघु उद्योजकांची देणी, नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक क्लस्टरची निर्मिती तसेच इतर प्रश्न योग्य पाठपुरावा करणार असून उद्योजकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होईल असा विश्वास खा.गोडसे यांनी दिला.

इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मालाची मुंबईहन होणाऱ्या वाहतूकीतील अडथळ्यांविषयी बोलतांना हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मुंबईतील परिस्थिती बघता मध्यंतरी काही काळ थांबावे लागेल असे खासदारांनी सांगितले. स्थानिक, जिल्हा पातळीवरील उद्योजकांचे प्रश्न वैयक्तिक लक्ष घालून मार्गी लावेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या वेबिनरला १०० हुन अधिक उद्योजकांचा सहभाग नोंदवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या