नवीन नाशिक प्रभाग सभेत खडाजंगी

अधिकारी अकार्यक्षम; लोकप्रतिनिधींचा आरोप

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी नगरसेवकांनी अधिकार्‍यांवरील रोष व्यक्त करताना सर्वच अधिकारी अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवत नवीन नाशिक प्रभाग समितीची बैठक संपन्न झाली.
नवीन नाशिक प्रभाग समितीची बैठक सभापती हर्षा बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी घंटागाडीच्या निर्णयाबद्दल ठोस काही निर्णय घ्या अन्यथा प्रभाग समितीची बैठकच घेऊ नका असे बैठकीच्या सुरवातीसच अधिकार्‍यांना सांगितले.
यावेळी प्रभागातील समस्ये संदर्भात बोलतांना नगरसेवक श्याम साबळे यांनी सांगितले की, कामटवाडे परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे मात्र अधिकार्‍यांना अद्याप याचे मूळ कारण शोधण्यात यश आले नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. येत्या ३ दिवसांत जर याप्रश्‍नी काही उपाययोजना न केल्यास जनतेसह रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देखील साबळे यांनी दिला.
नगरसेवक मुकेश शहाणे यांनी घंटागाडीची समस्या मांडून त्यांच्या प्रभागातील अंगणवाड्यांचे रंगकाम निकृष्ठ दर्जाचे केले असून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. नवीन नाशिक परिसरात खासगी कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम सूरु असून रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरावस्था झाली असून त्याकामी प्रशासनावर ठपका ठेवला. परिसरातील नाल्यांची दुरवस्था झाली असून त्याकामी आरोग्य विभाग पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचा आरोप देखील केला. अधिकारी लोकप्रतिनिधींशी जबाबदारीने बोलत नसल्याने याविषयी नाराजीचा सूर शहाणे यांनी व्यक्त केला.
नगरसेविका रत्नमाला राणे यांनी उत्तमनगर येथील रस्त्याप्रश्‍नी बांधकाम विभागाला पत्र देऊन देखील अद्याप पर्यंत त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे सांगितले. अधिकार्‍यांना जर जनतेची कामे करायचीच नसतील तर त्यांनी खुर्चीवर का बसावे? असा सवाल देखील राणे यांनी केला. घंटागाडीचा ठेकेदार हा मनपाचा जावई आहे का? सर्वच लोकप्रतिनिधींनी तक्रार करून देखील प्रभागातीलच नव्हे तर नवीन नाशिक मधील सर्वच ठिकाणी घंटागाडीचा अनियमितपणाचा प्रश्‍न भेडसावत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
प्रतिभा पवार यांनी त्यांच्या प्रभागात पथदीपांची खूप मोठी समस्या असून उपेंद्रनगर मधील मोकळ्या जागेत लाईट बसविण्याची प्रलंबित मागणी पुन्हा एकदा बोलून दाखविली. किरण गामणे-दराडे यांनी नवीन नाशिकमधील करवाढ रद्द करावी यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींच्या स्वाक्षर्‍या घेऊन महासभेत हा विषय मार्गी लावण्यासाठी सभापतींना पत्र दिले. तसेच पाथर्डी फाटा येथील जलकुंभाच्या रक्षणासाठी तेथे सिसिटीव्ही त्वरित बसविण्याची मागणी देखील केली.
राकेश दोंदे यांनी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा मनपा कार्यालयात कुत्रे भेटीसाठी आणू असा ईशारा दिला. अंबड परिसरातील मटण-चिकन च्या दुकानासमोर मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या.
छाया देवांग यांनी परिसरातील अंगणवाड्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. सभापती हर्षा बडगुजर यांनी त्वरित विभागीय अधिकार्‍यांसह अंगणवाडीला भेट देऊन तेथील प्रश्‍न त्वरित मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.
प्रवीण तिदमे यांनी प्रभाग २४ मधील रस्त्यांचे पॅच वर्क साठी २३ लाख ४७ हजार रुपयांचा खर्च नक्की कुठे केला असा सवाल अधिकार्‍यांना केला. जोपर्यंत या कामाची पाहणी होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबविण्याच्या सूचना दिल्या. नवीन नाशिकमध्ये नेहमीच खडी व मुरुमाची आवश्यकता भासत असल्याने गोडाऊनमध्ये त्याचा साठा करून ठेवण्यात यावा असा सल्ला देखील दिला.
अधिकारी कामामध्ये दिरंगाई करीत असून फक्त मलई मिळेल तिथेच काम करणार का? असा सवाल करीत ८ दिवसांत ठोस निर्णय घ्या अन्यथा नगररचना विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा तिदमे यांनी दिला.
नवीन नाशिक परिसरात बर्‍याच ठिकाणी विद्युत पोल कापले असल्याने त्याचे कारण द्यावे व ज्या ठेकेदाराने संबंधित पोल लावले व ज्याने ते कापले याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी तिदमे यांनी केली.
दीपक दातीर यांनी माऊली लॉन्स परिसरातील हॉकर्सला स्थलांतरित केल्याबद्दल विभागीय अधिकार्‍यांचे स्वागत केले. तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे होते तोवर परिसरात रोज स्वच्छता होत होती व त्यानंतर आरोग्य विभागाला मरगळ आल्याचे दातीर यांनी सांगितले.
फडोळ मळा परिसरात गेल्या ८ दिवसांपासून घंटा गाडी न आल्याने परिसरातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने घंटागाडीच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सर्व अधिकार्‍यांना आगामी काळात नवीन नाशिककरांच्या समस्या सोडवाव्यात तसेच यापुढे लोकप्रतिनिधींच्या तक्रारी येता काम नये अशी सुचना दिली.
यावेळी नगरसेवक भगवान दोंदे, निलेश ठाकरे, सुवर्णा मटाले कल्पना पांडे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*