Saturday, April 27, 2024
Homeनाशिक‘जनता संचारबंदी’ गरजेचीच

‘जनता संचारबंदी’ गरजेचीच

पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा:तरुणाईचे मत

नाशिक ।प्रतिनिधी
करोनाच्या आपत्तीला संपूर्ण जग सामोरे जात आहे. या साथरोगाचा सामना करण्यासाठी रविवारी लोकांनी स्वत:च घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाला नागरिकांनी साथ द्यावी, जेणेकरून करोनाचा सामना करता येईल, सध्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनता संचारबंदी गरजेचीच असल्याचे मत शहरातील तरुणाईने मांडले आहे.

- Advertisement -

करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारी, २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत जनतेने स्वत:हून संचारबंदी पाळावी, ‘जनता संचारबंदी’च्या काळात कोणीही घरातून बाहेर पडू नका. चौकाचौकात एकत्र येऊ नका. बाजारात विनाकारण फिरू नका. घर-सोसायटीच्या आवारातही एकत्र येऊ नका, असे आवाहन मोदींनी केले आहे.‘जनता संचारबंदी’म्हणजे संकटाच्या काळात आत्मसंयम दाखवण्यासाठीची परीक्षा असेल. देशहितासाठी हे कर्तव्य पार पाडा. या संदर्भात विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या संघटनांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा.

डॉक्टर, परिचारिका, सरकारी कर्मचारी, पोलीस, रेल्वे- बस कर्मचारी, घरपोच सेवा देणारे लोक स्वत:ची पर्वा न करता जनतेची सेवा करत आहेत. ही सेवा सामान्य म्हणता येणार नाही. करोनाची बाधा होण्याचा धोका असतानाही ते काम करत आहेत. हे खरे राष्ट्ररक्षक आहेत. अशा व्यक्ती, संघटनांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

आपले कर्तव्य
या साथरोगाच्या काळात विविध क्षेत्रातून जीव धोक्यात घालून सेवा करत आहेत. आपण या सर्वांचे  मन:पूर्वक आभार मानने, हे आपले कर्तव्य आहे.
अ‍ॅड.यश भुजबळ, नाशिक.

स्वत:चे रक्षण करावे
संपूर्ण जग करोनाशी लढत आहे. या साथरोगाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी रविवारी २२ मार्चला स्वत:च घराबाहेर न पडता जनता कर्फ्यू पाळावा. प्रत्येक नागरिकाने या विषाणूपासून स्वत:चे रक्षण करण्यास प्राधान्य द्यावे.
सूरज पेंढारे, महाविद्यालयीन तरुण, अंंबड.

पालन करावे
जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे. सर्वांनी यात सहभागी व्हावे, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी साथ द्यावी.
अनुजा माने, तरुणी, नाशिक.

आभार मानावे
सर्वांनी एकत्र येऊन या साथरोगाचा सामना करणे गरजेचे आहे. आज जर आपण याची दखल घेतली, तरच उद्या आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. सेवा देणार्‍यांचे आभार मानले पाहिजे.
स्नेहल जाधव, तरुणी.

- Advertisment -

ताज्या बातम्या