Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजिल्हा बँकेला कर्जमाफी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

जिल्हा बँकेला कर्जमाफी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली होती.आचारसंहितेमुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसर्‍या यादीला याचा फटका बसल्याने कर्जमाफीची रक्कम रखडली होती.दरम्यान,करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्जमाफीला आलेला आचारसहिंतेचा अडसर आता दूर झाला आहे.यामुळे आता कर्जमाफीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

दरम्यान,३१ मार्चपूर्वी कर्जमाफीची रक्कम बँकेला मिळावी,यासाठी जिल्हा बँक प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.यासाठी विभागीय सहनिंबधक, शासनांशी संपर्क साधून पत्रव्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा घोषणा केली होती.

दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज थकीत असलेले जिल्हा बँकेचे एकूण एक लाख आठ हजार खातेदार आहेत.तर राष्ट्रीयीकृत बँकांचे जवळपास ३६ हजार खातेदार आहेत. सरकारने काही दिवसांपूर्वीच पहिली यादी जाहीर केली, त्यात चांदोरी (ता.निफाड) आणि सोनांबे (ता.सिन्नर) या दोन गावांमधील ७७८ शेतकऱ्यांचा समावेश होता.या शेतकऱ्यांचे  आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर त्यांच्या कर्जखाती थकबाकीची रक्कमही जमा झाल्याने जिल्हा बँकेच्या तिजोरीत साडेचार कोटींची भर पडली.

राज्यात दुसरी यादी जाहीर झाली.मात्र,जिल्हयातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने राज्य सरकारने तूर्त दुसरी यादी जाहीर केलेली नाही.आचारसहिंता असल्याने यादी जाहीर झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुका या ३० मार्च रोजी होत आहेत.त्यामुळे निवडणुक झाल्यानंतर यादी जाहीर करून कर्जमाफी रक्कम वर्ग केली जाईल,असे सूचित करण्यात आले होते.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हयातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकण्याचा निर्णय घेतला.या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.ग्रामपंचायत निवडणूक अन त्यांची आचारसहिंता सांगून दुसरी यादी शासनाने लांबविली होती.मात्र,ही निवडणुकचं पुढे ढकलण्यात आल्याने आचारसहिंता संपुष्टात आली. त्यामुळे शासनाने रोखलेली कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

यादीकडे शेतकर्‍यांचे लक्ष
शासनाकडून ही यादी कधी जाहीर करते,याकडे आता जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.यादी जाहीर झाली म्हणजे कर्जमाफीची रक्कम जिल्हा बँकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.त्यामुळे जिल्हा बँक प्रशासनाकडून कर्जमाफीची रक्कम मिळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.कर्जमाफीची रक्कम केव्हा मिळणार? याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या