जिल्हा बँक निवडणूक; अवघे ४७१ ठराव

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांकरिता निवडणूक होत असून यासाठी संस्थेच्या प्रतिनिधीचे ठराव मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातून ४७१ ठराव आतापर्यंत प्राप्त झाल्याचे माहिती सूत्रांनी सांगितले.क्रियाशील व अक्रियाशील सभासदत्वाची अट टाकल्याने ठराव कमी झाल्याची चर्चा आहे.३१ जानेवारीपर्यंत ठराव सादर करण्याची अंतिम मुदत आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून संचालकपदाच्या २१ जागा आहेत.यामध्ये विविध कार्यकारी संस्था (सोसायटी) या गटांतून प्रत्येकी एक याप्रमाणे १५ प्रतिनिधी, उर्वरित हौसिंग सोसायटी, नागरी बँका, बिगरशेती पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, मजूर संस्था, खरेदी-विक्री संघ, दूध संघ, वैयक्तिक सभासद, कुक्कुटपालन व इतर संस्था याचा १ प्रतिनिधी, तसेच राखीव गटातून ५ प्रतिनिधी निवडून येत असतात.(यात महिला प्रतिनिधीकरिता २, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील सदस्य १, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गातील सदस्य १, इतर मागासवर्गातील सदस्य (ओबीसी) १.

जिल्हा बँकेसाठी सुमारे ९ हजार ५०० संस्था मतदानास पात्र आहेत. यात एक हजार ५६ विविध कार्यकारी संस्था असून, यातील १ हजार ४६ विकास सोसायट्या पात्र आहेत. उर्वरित ८ हजार ३०० संस्था या हौसिंग सोसायटी, नागरी बँका, पतसंस्था, मजूर सोसायटी, खरेदी-विक्री संघ, दूध संघ, कुक्कुटपालन व इतर संस्था, तसेच वैयक्तिक सभासद आहेत. मतदानासाठी संस्थेच्या प्रतिनिधीचा ठराव तालुक्यातील सहायक निबंधक, तालुका उपनिबंधक यांच्याकडे पाठविले जात आहे. आतापर्यंत केवळ ४७१ संस्थांचे ठराव प्राप्त झालेले आहेत. यात अ गटातील २४२ तर, ब गटातून २२९ ठरावांचा समावेश आहे.

अटीचा फटका

ठराव पाठविण्यासाठी क्रियाशील व अक्रियाशील सभासदत्वाची अटीचा फटका बसत असल्याची बाब पुढे येत आहे. ९७ घटना दुरुस्तीनंतर संस्था क्रियाशील सभासद होणे आवश्यक असल्याचे बंधनकारक केले आहे. यात संबंधित संस्थेने किमान शंभर शेअर्स घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेक संस्थांचे भाग अपूर्ण असल्याने त्यांचे ठराव पठविण्यास अडचण येत आहे.तसेच शहरात एकूण दोन हजार ४५६ हौसिंग सोसायट्या आहेत.मात्र, सहकार कायद्यानुसार संस्थांनी लेखापरीक्षण केलेले नसल्याने ८०० सोसायट्या अपात्र ठरल्या आहेत. या कारणांमुळे ठराव कमी येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *