Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्हा बँक प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीला मुदतवाढ

जिल्हा बँक प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीला मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी

शेतकर्‍यांची अर्थवाहिनी समजल्या जाणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून बँकेच्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीला १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. १७ फेब्रुवारी २०२० ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. तर अंतिम मतदार यादी ११ मार्च २०२० ला प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार सभासदांना ३१ जानेवारीपर्यंत ठराव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवावा लागणार आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेत निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. २१ संचालक असलेल्या बँकेसाठी एप्रिल २०१५ ला पंचवार्षिक निवडणूक झाली होती. येत्या चार महिन्यांत विद्यमान संचालकांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मतदार याद्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

बँकेचे एकूण साडेनऊ हजार सोसायटी सभासद असून त्यांचे प्रतिनिधी हे मतदार आहेत. निवडणुकीत प्रत्यक्ष सोसायटी नव्हे तर या सोसायटीने ठराव करून दिलेला प्रतिनिधीच मतदानाचा हक्क बजावत असतो. या सगळ्याच सोसायट्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर केली जाणार आहे. त्यानंतर सोसायट्यांकडून त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधींचा ठराव मागवण्यात येईल.

या याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकत मागवण्यात येईल. हरकतींवर सुनावणी होऊन मग मतदार याद्या अंतिम करण्यात येईल. या सार्‍या प्रक्रियेसाठी ९० दिवसांचा कालावधी लागणार असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी बँकेला प्रारूप मतदार यादी सादर करावी म्हणून पत्र दिले आहे. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण ४५ दिवसांनी म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुकीचा बिगुल वाजण्याची चिन्हे आहेत.

मतदार यादी वेळापत्रक
३१ जानेवारी २०२० – सभासद संस्थेचे ठराव मागवण्याची अंतिम मुदत
१ फेब्रुवारी – प्राप्त संस्था प्रतिनिधींचे ठराव बँकेस देणे
७ फेब्रुवारी – बँकेने मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यास देणे
१७ फेब्रुवारी – प्रारूप मतदार यादी
२६ फेब्रुवारी – प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदवणे
६ मार्च – प्राप्त हरकती निकाली काढणे
११ मार्च – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या