Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवरात्री २०१९ : ‘स्त्री’शक्तीचे महात्म्य अधोरेखित करणारा उत्सव

Share

नाशिक | प्रतिनिधी 

आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. हिंदू धर्मानुसार देवीची दोन नवरात्रे असतात; वासंतिक आणि शारदीय. भविष्य पुराणात या देवीचे महात्म्य सांगताना या शारदीय नवरात्रोत्सवाचे मूळ दिसून येते. मुळात ही पूजा दुर्गेची. महिषासुराशी ९ दिवस युद्ध करून विजय मिळवून सकळ सृष्टीची त्राता असणारी ती आदिमाया तिच्या उपासनेचा नऊ रात्रींचा उत्सव.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून दुर्गेचा जागर सुरू होतो. मुळात रात्रीच्या प्रहरी बाह्यांतरीक शांतता असताना ही उपासना केली जाते. त्यामुळे या उत्सवास जागर असे म्हटले जाते. दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर विड्याची नऊ पाने लावतात. त्यावर एक श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू वाहून हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.

९ दिवस कुमारिकेची पूजा केली जाते. लहान मुली ‘भोंडला’ ‘हादग्याचा खेळ मांडतात(मराठवाडा आरि राज्याच्या काही भागात भोंडल्याला भुलाबाई वगैरे शब्द प्रचतिलत आहेत) नंतर खिरापती वाटून हा उत्सव साजरा केला जातो. ही झाली पूर्वापार चालत आलेली परंपरा. पण या ट्रेंड सेटिंगच्या दुनियेत सण-उत्सव तर सगळ्यात प्रभावी माध्यम असते नव्याने काहीतरी सुरू करण्याचे. भारतीय संस्कृती, विचारधारा कायम जनमानसानुसार आपले रुपडे ठरवते, त्यामुळे तसेच काहीसे मार्केटिंग (क्लृप्ती)गिमिक वापरुन नवरात्रोत्सवी ९ दिवस ९ रंगाच्या साड्या, कपडे घालण्याची संकल्पना उदयास आली. अर्थातच या मार्केटिंग ‘गिमिक’ने महिलावर्गावर चांगलाच प्रभाव पडला आणि हा ट्रेंड सुरू झाला की, नवरात्रात नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे असतात.

मुळात देवीला दररोज नवीन वस्त्र चढण्याची प्रथा मंदिरांमध्ये पूर्वापार चालत आली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार त्याचे रंग सांगितले गेले आहेत. तसेच या नऊ दिवसांचे म्हणाल तर सणवार, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस साजरा करताना जसे तुम्ही नवीन वस्त्र परिधान करता तसेच हे नऊ दिवस तिचा उत्सव आहे म्हणून तिच्यासाठी ही नवीन विविध वर्णाची वस्त्रे. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा(दि.२९) रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळवारी(दि.१ ऑक्टोबर) लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.

थोडक्यात काय तर सण उत्सव यांचे बदलते सामाजिक आयाम म्हणजे या संकल्पना. ही उपासना आदिमायेची, त्या शक्तीची जी माता आहे, पत्नी आहे, बहीण आहे, कन्या आहे. खरेतर शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कूष्मांडा (किंवा कुष्मांडी), स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या नवदुर्गासह त्या सर्व नात्यांचा हा उत्सव जी नाती एक स्त्री तिच्या उभ्या आयुष्यात नेटाने निभावते. नवरात्रीत कुमारिकेची पूजा करतात. सवाष्णीची ओटी भरतात. तिच्या प्रत्येक रूपाला मनोभावे वंदन करतात. आपली भारतीय ‘स्त्री’ ही कौसल्या, सीता, सावित्री, अंबा, कुंती, गांधारी, द्रौपदी, गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी, राधा, यशोदा, मीरा यांच्या वंशाची आहे. ती जन्माने स्त्री आहे यातच तिला या आदर्श स्त्रियांच्या आचरणाचे धडे देत त्यांची अनुयायी घडवले जाते. एकीकडे तिच्यात गार्गी, मैत्रेयी सारखी विद्वत्ता हवी दुसरीकडे सावित्रीसारखी ती पतिव्रता असावी, कौसल्या यशोदा यांच्यासारखी ती माता असावी तर सीतेसारखी त्यागी असावी. राधेसारखे तिने प्रेम करावे, मिरेसारखी तिने भक्ती करावी. हे सर्व गुण आजच्या स्त्रीमध्येही तंतोतंत उतरलेले दिसतात. किंबहूना त्यामुळेच स्त्रीशक्तीचे महात्म्य अधोरेखित होते.

नव्या काळात स्त्रीवादी विचारधारा असा प्रवाह निर्माण झाला. स्त्रीवाद म्हणजे लिंगभेद झुगारून स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा एक विचारप्रवाह. त्यामुळे ही स्त्रियांचे ऐतिहासिक दुय्यमत्त्व उजेडात आणून हे शोषण संपवण्याचा प्रयत्न करते. पण आपण एका गोष्टीकडे कानाडोळा करतो ती म्हणजे ही एक सामाजिक, राजकीय जाणीव आहे. स्त्रीवाद ही संकल्पना जरी पाश्चात्त्य आधुनिकतेत उदयास आली अशी सामान्य समजूत असली तरी ही जाणीव त्यापूर्वीही वेगवेगळ्या कालखंडात आणि ठिकाणी आढळून आलेली दिसते. म्हणूनच एकच स्त्रीवाद नसून अनेक स्त्रीवादाची अनेक रुपे दिसून आली आहेत. आजची स्त्री ही उपरोल्लेखित सर्व भूमिका नेटाने बजावते. ती सुशिक्षित आहे, ती सक्षम आहे, पुढारलेली आहे. ती सोशीक आहे म्हणावे तर एक विचारसरणी तिचा सन्मान करते आणि तिला दुसरी दुर्बल मानते. कारण तिच्या दुर्गा, द्रौपदी होण्यातही आक्षेप आणि तिने हरणे तर बरोबर नाहीच. मग आज तिने करावे तरी काय? तिने आज खर्‍या अर्थाने ‘ट्रेंड सेटर’ होण्याची गरज आहे. नव्या काळाबरोबर चालण्याच्या क्षमता, ज्ञान, माहिती तिने स्वत:त विकसित करावी. जसे नवरंगाच्या वस्त्रांचा ट्रेंड तिच्या एका रुचीने आज इतका गाजवला आहे तर तिच्या आयुष्याचा ट्रेंड, ध्येय तिने का ठरवू नये? परिस्थिती आपण घडवू तशी घडते, त्यामुळे आज या आदिमायेने सामंजस्याने तिला हवी तशी परिस्थिती घडवून स्वतःचा उद्धार करायचा आहे. सर्वसामान्यांच्या चौकटीत राहायचे की जाचक जोखडाचे बंधपाश तोडून भरारी घ्यायची हे तिने स्वतः ठरवायची वेळ आली आहे.

लोक काय म्हणतील, यापेक्षा मला काय वाटते याचा विचार तिने करायला हवाय. अर्थातच तो योग्यायोग्यतेचा. आधुनिक स्त्री विचार करण्याइतकी समंजस आणि हुशार ती नक्कीच आहे. नऊ महिने एक जीव पोटात सांभाळून त्याला जगात येण्याजोगे झाल्यानंतर जन्म देणारी, पंखात बळ आल्यावर घरट्यातून ढकलून त्याच्या भरारीकडे डोळे लावणारी ही स्त्री कधी कमजोर कधीच नव्हती, आजही नाही आणि भविष्यातही नसणार. आता तिला साथ देणारे असो वा नसो आज तिने तिचे सत्व, अस्मिता, आत्मसन्मान जपत टे्ंरड, ध्येय ठरवून ‘नवदुर्गा’ व्हायचे आहे. आणि तेव्हाच ती आदिमाया म्हणून ओळखली जाईल. उपासना ही तुमच्यातील शक्तीची असते. जो पर्यंत आजची दुर्गा स्वतःतील शक्तीची जाणीव करून घेऊन, ती करवून देऊ शकत नाही तोपर्यंत तिची उपासना कोणीच करणार नाही. आता आदिमायेच्या उपासनेच्या या उत्सवाकडे बघताना ही अर्थपूर्ण उक्ती कशी विसरून चालेल? ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रैवास्तु न पूज्यन्ते सर्वस्तत्राफलाः क्रियाः जेथे स्त्रीचे (सर्वार्थाने) पूजन होते. तेथेच देवता गण संतोषने आणि प्रसन्नतेने राहतो.

ज्या घरात स्त्रीची अवहेलना होते, तेथील सर्व धर्मकृत्ये निष्फळ होतात. परंतु या उक्तीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देण्याचा काळ आला की मगच आम्हाला याची आठवण येते. हा काळ म्हणजे विशेष करून महिला दिन आणि नवरात्राचा. सध्या संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी सोशल माध्यमांवर ‘रिसंस्कृत ‘संंस्कृत फॉर यू ’ सारखे पेजेस् दिवसाचे महत्त्व पाहून त्यानुसार संस्कृत श्लोक घेऊन एक चित्र तयार करतात. ज्यात त्या श्लोकांचा अर्थ असतो. जेणेकरून आपली संस्कृती आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत. पण आम्ही स्त्रीच्या सन्मानाच्या तिला पूजण्याच्या गोष्टी आम्ही अशाच तात्पुरते स्टेट्स स्टोरीस पुरत्या मनावर घेतो. हॅशटॅग करत स्टेटसवर टाकतो आणि त्या चोवीस तासांच्या स्टोरीलाईन नंतर आम्ही पहिले पाढे पंचावन्न म्हणत ‘जैसे थे’ होतो. कारण आपल्या मते या गोष्टी म्हणजे नव्याने रूढ झालेले ‘शास्त्र असते ते’. पण खरोखर ही उक्ती अथवा यासारख्या अनेक उक्ती आपण समजून घेतो का? आचरणात आणू शकतो का? हे प्रश्न एकदा मनाला विचारून मग आपण समाज माध्यमांवर कोणतीही पोस्ट टाकायला हवी, असे दहा पैकी दोघांना जारी वाटले तरी खर्‍या अर्थाने आदिमायेची उपासना होईल.

रेणुका येवलेकर ,नृत्यनाट्य अभ्यासक

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!