Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रेल्वे स्थानकावर लवकरच बॅटरी कार सर्व्हिस

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

रेल्वेने वैविध्यपूर्ण नवनवीन योजना अंमलात आणण्याचा ध्यास घेतला असून येथील रेल्वे स्थानकावर लवकरच बॅटरी कार सर्व्हिस योजनेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

या कारच्या माध्यमातून बॅटरीवर चालणारी प्रदूषणविरहित कार नागरिकांच्या सेवेत येणार असून चार प्लॅटफॉर्मवर उतरणार्‍या प्रवाशांना आपले सामान रेल्वे स्थानकाच्या बाहेर सुरक्षित रित्या आणता येणार आहे. त्यामुळे कुलींचे कमी श्रमात स्मार्ट वर्क होणार असून प्रवाशांचे सामान सुरक्षितपणे रेल्वे स्थानकाबाहेर वाहून नेण्यास मदत होईल.

नाशिकरोड रेल्वे स्टेशन हे उत्तर महाराष्ट्राचे केंद्रबिंदू आहे. या ठिकाणावरून लाखो लोक प्रवास करतात. नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले नागरिक, सैन्यदलात काम करणारे फौजी बांधव यांचा राबता येथील रेल्वे स्टेशनवर कायम असतो. त्यांच्या सामानाची सुरक्षितरीत्या हालचाल झाली पाहिजे या दृष्टीने रेल्वे स्थानकावर लवकरच बॅटरी कार सर्व्हिस ही अभिनव योजना सुरू होणार आहे.

रिसर्च अँड डेव्हलपमेंट या तत्त्वावर सुरू करण्यात येणारी ही योजना प्रवाशांची सध्या लक्ष वेधून घेत आहे. शेगाव, नागपूर, मुंबई येथे काही ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर या योजनेचा जानेवारी महिन्यापासून शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

या योजनेमुळे कुलींनाही कमी श्रमात चांगला मोबदला मिळणार असून ही बॅटरी कार कुलींना वापरायला देणार आहे. या माध्यमातून रेल्वेला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार असून लवकरच त्याच्या निविदा निघणार आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर चार प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांच्या सामानाची ने-आण करण्यासाठी बर्‍याच वेळा कोणी उपलब्ध नसतात. या बॅटरी कारमध्ये बसून प्रवाशांनासुद्धा नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर येता येणार आहे. अपंग, दिव्यांग, गरोदर माता यांना या सेवेचा जास्त लाभ होणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!