Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

…आता नजरा निकालाकडे!

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

सोमवारी (दि. २१) विधानसभेची निवडणूक संपन्न झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी काल निवांतपणा अनुभवला. मात्र उमेदवारांसह सर्वांच्याच नजरा उद्या होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे.

संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या. या निवडणुकीत प्रामुख्याने महायुती विरूद्ध महाआघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी, मनसे आदी पक्ष रिंगणात होते.

मात्र खरी लढत युती विरूद्ध आघाडी अशी असल्याचे कालच्या मतदानावररून दिसून आले. गेल्या महिनाभरापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. शनिवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवार व समर्थकांनी शनिवार व रविवारची रात्र जागून काढली.

सोमवारी पावसाचे सावट असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो की काय, अशी भीती वाटत होती. मात्र मतदानाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वच मतदार संघात टक्केवारी वाढली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला.

सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपलाच उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वास पुर्व मतदार संघातील युतीचे उमेदवार अ‍ॅड.राहुल ढिकले, आघाडीचे बाळासाहेब सानप यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.

तर दुसरीकडे देवळाली मतदार संघाचे योगेश घोलप यांच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.घोलप पुन्हा विजयी होतील अशा विश्‍वास व्यक्त केला. तर आघाडीच्या सरोज आहिरे यांच्या समर्थकांनीसुद्धा विजयाचा दावा केला.

दरम्यान मतदानाची प्रक्रिया सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. त्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांना अचूक टक्केवारी देण्यास विलंब झाला. काल निवडणूक अधिकार्‍यांकडून अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली.

गेल्या महिनाभरापासून सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात दंग होते. सोमवारी अनेकांनी घराकडे परतले.  दरम्यान काल दिवसभर चौकाचौकांत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षात घेता आकडेमोड सुरू असल्याचे दिसून आले. अनेकांनी कोणता उमेदवार विजयी होणार म्हणून लाखोच्या पैजा लावल्या आहेत.

आजच्या दिवस सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांच्या मनात घालमेल करणारा असून उद्या सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. तोपर्यंत सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!