नाशिकरोड रेल्वेस्थानकात दिव्यांगांना ‘नो एन्ट्री’

0
ना. रोड | प्रतिनिधी स्वच्छता आणि सोयी-सुविधेत देशात आघाडीवर असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वंयचलित सरकते जीने, लिफ्ट, स्वस्तात पाणी देणारे वाटर मशिन, सीसीटिव्ही कॅमेरे अशा आधुनिक सुविधा देण्यात पास झालेले हे स्टेशन अपगांबाबतीत फेल झाल्याची अपंगाची तक्रार आहे. स्थानकाच्या चोहोबाजूंनी कायमस्वरुपी लोखंडी अडथळे लावण्यात आल्यामुळे अपंगांना दुचाकीवाहन आणि व्हिलचेअरसह स्थानकात प्रवेशासाठी मार्गच राहिलेला नाही. त्यामुळे वेळेत गाडी पकडताना अपंगांचे अत्यंत हाल होत आहे.

येथील रेल्वेस्टेशन हे देशात स्वच्छतेबाबत दोन वेळा पहिल्या दहांमध्ये आले आहे. स्थानकाची दिवसातून तीन वेळा आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने स्वच्छता केली जाते. त्यासाठी तीन-चार डझन कंत्राटी कर्मचारी रात्रंदिवस राबत असतात. गेल्या महिन्यात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील सरकत्या स्वयंचलित जिन्याचे उद्घाटन झाले. प्लॅटफार्म दोन आणि तीनवरही असे जिने दिवाळीपर्यंत उभारले जाणार आहेत.

वर्षभरापूर्वी प्लॅटफार्म एक आणि दोनवर लिफ्ट सुरू झाल्या आहेत. त्याचा फायदा अपंगांना होत आहे. सर्व प्लॅटफॉर्मवर स्वस्तात शुद्ध आरोयुक्त पाणी प्रवाशांना देण्यासाठी वॉटर वेन्डिंग मशीन लावण्यात आले आहेत. कुंभमेळ्यात सीसीटीव्ही लावून चौथा प्लॅटफॉर्म बांधण्यात आला. तो इतर तीन प्लॅटफॉर्मना जोडण्यात आला आहे. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. तरीही रेल्वेच्या चुकीच्या नियोजनामुळे अपंग प्रवाशी या सर्व सुविधांना मुकत आहेत. या सुविधा असूनही नसल्याची अपंगांची तक्रार आहे.

अपंगांसाठी सर्व शासकीय कार्यालयामध्ये स्वतंत्र सुविधा असावी, असे सरकारचे निर्देश आहेत. येथील रेल्वेस्थानकात अपंगांसाठी स्वतंत्र पार्किंग आहे. तिकीट बुकिंग आणि रिझर्व्हेशनकडे जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प आहे. या दोन्ही ठिकाणी तिकीट काढण्यासाठी स्वतंत्र खिडकी आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीही रॅम्प आहेत. लिफ्टची सोय आहे.

तसेच प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. रेल्वेगाडीत स्वतंत्र कोच आहे. रेल्वे आणि रोटरीने स्थानकात मोफत व्हिलचेअर्स उपलब्ध केल्या आहेत. अपंगांना तिकीटात ७५ टक्के सवलत तर सोबत कोणी असल्यास पन्नास टक्के सवलत आहे. प्रवासादरम्यान किंवा प्रवासापूर्वी मदतीसाठी रेल्वेचा कर्मचारी वर्ग आहे.

अपंगांसाठी रेल्वेने एवढ्या सोयी-सुविधा दिल्या आहेत. पण रेल्वेस्थानक आणि गाडीपर्यंत पोहाचायचे कसे, असा प्रश्‍न अपंगांना पडला आहे. रेल्वेस्थानकात बेकायदेशीर पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सर्व बाजूंनी लोखंडी पाईप लाऊन अडथळे करण्यात आले आहेत.

त्यामुळे अनाधिकृत पार्किंग, फेरीवाले, रिक्षा यांना प्रतिबंध झाला असला तरी अपंग रेल्वे कर्मचारी, प्रवाशांना दुचाकी, व्हिलचेअर घेऊन स्थानकात जाता येत नाही. गेल्या आठवड्यात अपंग प्रवाशी व्हिलचेअरवर बसून स्थानकात प्रवेशाची प्रतीक्षा करत होता. कोणीच मदत करत नव्हते. पाच-सहा फौजींनी त्याची व्हिलचेअर उचलून स्थानकात नेली. स्थानकात पार्किंगची सोय असूनही बॅरिकेटिंगमुळे अपंगांना दूरवर वाहने उभी करावी लागतात. तेथून दररोज सकाळी रखडत-खुरडत गाडी पकडण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

अपंगांसाठी स्थानकाच्या बाहेर पार्किंगची जागा राखीव आहे. तेथे अन्य प्रवाशी वाहने लावतात. याबाबत वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी आदेश देऊन अपंगांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अपंगासाठी मुख्य प्रवेशव्दाराजवळ स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली. फलकही लावण्यात आला. पण आता बॅरिकेटिंग केल्यामुळे अपंग तेथपर्यंत वाहन नेऊ शकत नाही.

मुख्य प्रवेशद्वार, रिझर्व्हेशन, सुभाषरोड, देवीचौक अशा सर्व बाजूंनी स्थानकात येण्याच्या मार्गावर लोखंडी बॅरिकेडस कायमस्वरुपी लावण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने ही समस्या त्वरित सोडविली नाही तर रेल्वेमंत्री आणि कोर्टाकडे तक्रार करणार असल्याची माहिती अपंगांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*