मनपा आयुक्त गमे यांचा अचानक दौरा

0
नाशिकरोड | प्रतिनिधी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल (दि. १५) मनपा विभागीय कार्यालयातील विविध विभागांना भेट देऊ पाहणी दौरा केला. आयुक्तांच्या या अचानक दौर्‍यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली.
या दौर्‍यात आयुक्तांनी बिटको रुग्णालयाशेजारी सुरू असलेले नवीन इमारतीचे बांधकाम, अग्निशामक दलाची इमारत, मनपा शाळा क्र.१२५, जेलरोड येथील मनपाचे रूग्णालय व पंचक अमृत उद्यानाची पाहणी करीत आढळुन आलेल्या त्रुटींबाबत संबधित अधिकार्‍यांना धारेवर धरीत सुधारणा करण्याचे आदेश दिले.
प्रारंभी आयुक्तांनी दुर्गा उद्यानशेजारील मनपा विभागीय कार्यालयातील बांधकाम विभाग, घरपट्टी, पाणीपट्टी, प्रभाग सभापती कार्यालय, उद्यान विभाग, भुमिगत गटार योजना विभाग, विद्युत विभाग आदी विभागांची पाहणी करीत कामाचा आढावा घेतला.
तसेच इमारतीला लागुन असलेल्या बिटको रूग्णालयाच्या कामाचा आढावा घेत हे काम कधी पुर्ण होणार याबाबत संबधित अधिकार्‍यांना विचारणा केली. यावेळी येत्या दिवाळीपर्यंत रूग्णालय नागरिकांसाठी खुले होणार असल्याचे संबधित अधिकार्‍यांनी सांगीतले.
त्यानंतर मुक्तीधाम मागील मनपाच्या शाळा क्र.१२५ मध्ये अंगणवाडी विभागाची पाहणी करीत विद्यार्थ्यांची थेट संवाद साधुन माहिती घेतली. जेलरोड येथील मनपाच्या पंचक अमृत उद्यानाची पाहणी केली असता उद्यानात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निदर्शनास आली.
वाढलेले जंगली गवत, सुकलेले वृक्ष बघून आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत संबधित ठेकेदाराचे ठेका रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी पंचक येथील मनपाच्या रूग्णालयाची पाहणीत आढळलेल्या त्रुटी दुर करण्याचे आदेश संबधित अधिकार्‍यांना दिले.
उड्डाणपुलाखालील बाजार हटविणार
बिटको चौकातील उड्डाणपुलाखालील भाजीबाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी असल्याने येथील भाजी बाजार जेलरोड येथील के.एन. केला शाळेशेजारी मनपाच्या आरक्षीत जागेत हलवणार असल्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच विक्रते ऐकत नसतील तर त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्याच्या सूचना विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना दिल्या.

LEAVE A REPLY

*