Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकला हवे मुख्यमंत्र्यांचे पाठबळ

Share

नाशिक । सुधाकर शिंदे

माजी मुख्यमंत्र्यांनी ऐन निवडणुकीच्या प्रचारात नाशिक महापालिकेला दत्तक घेतल्याची घोषणा केली आणि महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला. नंतरच्या अडीच वर्षात नाशिकच्या वाट्याला दत्तक पित्याकडुन लागले नाही. म्हणुन दत्तक पित्यावर विरोधकांकडुन सडकुन टिका झाली. केवळ मेट्रो आणि शहर बससेवा हे प्रकल्प पुढे आल्यानंतर आता योग्यता अभाव व तोट्याचा प्रकल्प म्हणुन या प्रकल्पाला विरोध सुरू झाला आहे. तेव्हा आता पुढच्या काळात नाशिककरांना दत्तक पालकाऐवजी पालकमंत्र्यांना भक्कम पाठबळ देणारे मुख्यमंत्री हवे आहे.

महापालिकेच्या सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नाशिककरांना साद घालतांना नाशिक महापालिकेला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले आणि भाजपाला नाशिककरांनी भरभरुन मतदान दिले. खुद्द मुख्यमंत्रीच दत्तक पालक बनल्याने नाशिककरांचे अनेक प्रश्न निकाली लागतील, नवीन प्रकल्प येतील अशी अपेक्षा नाशिककरांची होती. तसेच महापालिकेचे शासनाकडे पडुन असलेले चुटकी सरशी सुटतील, असे सर्वांना वाटले.

मात्र अपेक्षेप्रमाणे घडले नाही. अडीच तीन वर्षात दत्तक पालकाकडुन ठोस असे कोणतेही नाशिकसाठी काम झाले नाही. उलट नाशिक शहरातील काही कार्यालये व प्रकल्प इतरत्र पळविण्यात आली. याविरुध्द तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. याविरुध्द आंदोलने झाली. यातील काही आंदोलनात शिवसेनाही सहभागी झाली होती. तसेच नाशिक महापालिकेचे क्रीडा धोरण, जाहीरात धोरण, ब वर्गाच्या दर्जानुसार कामकाज, दोन हजाराच्यावर रिक्त पदे झाल्यानंतरही प्रलबीत असलेला आकृतीबंध आदीसह इतर प्रलंबीत कामांकडे भाजपाच्या आमदारांनी पाठपुरावा केला नाही आणि दत्तक पित्याने नाशिककरांच्या प्रश्नांकडे लक्ष घातले नाही. केवळ महापालिकेला सर्वार्थाने शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढे यांना पाठविल्यानंतर खुद्द भाजपाच्या पदाधिकार्‍यांना त्यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणावाला लागला. अखेर मुंढे यांची बदली दत्तक पालकला करावी लागली.

अखेरच्या टप्प्यात नाशिकला नवीन प्रकल्प म्हणुन मेट्रो आणि शहर बससेवा सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर या प्रकल्पापैकी आता शहर बससेवा प्रकल्प अंतीम टप्प्यात येत आहे. हा प्रकल्प तोट्या चालणारा असल्याने याविरोधात शिवसेना, काँँग्रेस व राष्ट्रवादी काँँग्रेस उतरले आहे. नाशिक शहरातील एस टी महामंडळाची शहर बससेवा तोट्यात असुन याबदल्यात महापालिकेने शंभर कोटींच्यावर रक्कम द्यावीत अशी मागणी एस. टी. कडुन करण्यात आली आहे. यानंतर एसटीने ३२५ बसेस पैकी २०० बसेस बंद करीत नाशिककरांनी कोंडी केली आहे. याविरुध्द काही राजकिय पक्षांनी विरोध केला. यात आत्ताच्या महाविकास आघाडीतील काही पक्षांचा समावेश होता. शहरातील विद्यार्थी, कामगार, मजुर, महिलांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटावा शहर बससेवेचा प्रश्न सुटावा अशी मागणी नाशिककरांची आहे. राज्य परिवहन महामंडळाप्रमाणेच देशभरात कोणत्याही महापालिकेची बससेवा नफ्यात नाही. तेव्हा महापालिका शहर बससेवेचा तोटा कमी करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला अनुदान द्यावेत अशी मागणी महापालिकेची आहे.

तसेच नुकतेच महापालिका पदाधिकार्‍यांनी शासन दरबारी प्रलंबीत असलेल्या प्रश्नांसंदर्भात पालकमंत्र्यांकडे साकडे घातले आहे. या प्रश्नांसाठी आता पालकमंत्र्यांना भक्कम पाठबळ मुख्यमंत्र्यांनी द्यावेत अशी अपेक्षा नाशिककरांची आहे. महापालिकेच्या निवडणुकीस अजुन दोन वर्ष बाकी असुन आता महापालिकेवर भगवा फडकावा अशी सुचना शिवसेना नेते खा. संंजय राऊत यांनी नाशिकमधील नगरसेवकांना केली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांना नाशिककरांसाठी काही योजना – प्रकल्प आणुन त्यांना जवळ करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी आहे. यामुळे शासनाकडुन अथवा पालकमंत्र्यांना भक्कम पाठबळ मुख्यमंत्र्यांनी दिले तरच नाशिकच्या विकासाची थांबलेली घोडदौड सुरू राहणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!