Thursday, April 25, 2024
Homeनाशिक४२५ उद्याने देखभालीसाठी द्यावीत : महापौर

४२५ उद्याने देखभालीसाठी द्यावीत : महापौर

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील ५२० उद्यानां पैकी ४२५ पर्यंत उद्याने देखभालीसाठी देण्यात यावीत, असे निर्देश महापौर सतिश कुलकर्णी यांनी उद्यान विभागाला दिले. दरम्यान देखभालीसाठी देण्यात येणारे उद्याने १ उद्यान १ ठेकेदार या पद्धतीने देण्यात यावे जेणेकरून उद्यानाची उत्तम देखभाल होऊ शकेल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

शहरातील उद्याने,स्वच्छता, वैद्यकीय,पशु वैद्यकिय,डेंग्यू मलेरिया या विषयी आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर सतीश कुलकर्णी यांनी आढावा बैठक नुकतीच घेतली. या बैठकीस उपमहापौर भिकूबाई बागुल, उद्यान विभाग प्रमुख शिवाजी आमले, सर्व विभागातील उद्यान निरीक्षक, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.सचिन हिरे, शहरातील सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक,स्वच्छता निरीक्षक मुकादम, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे , डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रारंभी उद्यान विभागाच्या अधिकार्‍यासमवेत शहरातील उद्यानांची माहिती व सुरू असलेल्या कामांचा आढावा महापौरांनी घेतला. यावेळी नागरिकांच्या व नगरसेवकांच्या उद्यानासंदर्भात पुढच्या काळात तक्रारी येणार नाही, यादृष्टीने काम उद्यान विभागाकडुन केले जावे याकरिता महापौरांनी काही निर्देश व सुचना अधिकार्‍यांना दिल्या. यात नगरसेवक अथवा नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्या २ महिन्यात सोडवाव्यात. सर्व उद्यानांची स्वच्छता त्यातील पालापाचोळा, पाथवे, त्यामधील तण काढणे, खेळणी दुरुस्त करणे आदी कामांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच विभागाला आवश्यक असणार्‍या बिगारी या पदाची मानधनावर नियुक्ती करावी. शहरातील झाडांच्या फांद्या कमी करण्याचे काम त्वरित हाती घेण्यात यावे. नवीन अंदाजपत्रकात दुरुस्ती कामासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा. देखभालीसाठी देण्यात आलेल्या उद्यानाच्या दर्शनी भागात ठेकेदारांची सर्व समावेशक माहिती त्यात संपर्क क्रमांक, कामाचा कालावधी, उद्यान उघडणे व बंद करणे आदी माहितीचा फलक लावण्यात यावा.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांना काही सुचना महापौरांनी केल्या. यात शहरात मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास होत असून त्याबाबतचा अहवाल २ महिन्यात सादर करावा.

तसेच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना महत्वपुर्ण सुचना केल्या. यात उघड्यावरील मटण, मासे, मच्छी दुकानांचा सर्व्हे करून १ महिन्यात उघड्यावरील विक्री बंद करावी. स्वच्छतेला प्राधान्य देऊन ब्लॅक स्पॉट पूर्णतः बंद करावेत ते बंद न झाल्यास याबाबतची जबाबदारी संबधितांची राहील.रुग्णांचे खासगी दवाखान्यातून रक्ताचे नमुने तपासणीसाठी थेट जिल्हा रुग्णालयात मनपासाठी स्वतंत्र कक्ष तयार करून घेतला असल्याने ३५ तासात त्याचा अहवाल प्राप्त होतो त्या अहवालानुसार त्वरित उपचार करण्यात यावेत. शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी तसेच खासगी संस्था यांना स्वच्छते बाबत पत्र देऊन स्वच्छता राखण्याबाबत अवगत करावे. डेंग्यू मलेरियाचा रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याबाबतची माहिती महानगरपालिकेस कळविणे बाबतचे पत्र सर्व खासगी रुग्णालयांना देण्यात यावे. विविध मुद्द्यांवर तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत महापौर यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या