Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक महानगर पालिका : पोट निवडणूकीसाठी आज मतदान

नाशिक महानगर पालिका : पोट निवडणूकीसाठी आज मतदान

सातपूर । प्रतिनिधी

नाशिक महानगर पालीकेच्या प्रभाग २६ मधील पोटनिवडणुकीच्या प्रचार यंत्रणा थंडावल्या असल्या तरी वैयक्तीक भेटीगाठीच्या माध्यमातून चारही प्रमुख पक्षांनी मोर्चे बांधणी केलेली दिसून येत आहे. त्यामुळे वरवर संथ सुरू असलेल्या प्रचारात मात्र ‘अंडर करंट’ तयार करण्याचा प्रयत्न गतीमान झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

प्रभाग २६ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. प्रभागात तीन नगरसेवक शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. तर एक जागा भाजपच्या पदरात पडली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिक्त जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेच्या तिकीटावर तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या पाठबळावर बांधकाम व्यावसायिक मधुकर जाधव विद्यमान भाजप नगरसेविका अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे, कामगार व कष्टकर्‍यांच्या मतांच्या बळावर माकपचे उमेदवार मोहन जाधव रिंगणात उतरले आहे. या चौरंगी लढतीत विजयश्रीच्या जवळ पोहोचणे तेवढे सोपे नाही. मतांच्या विभागणीची शक्यता लक्षात घेता अत्यल्प मतांच्या फरकानी निकाल लागण्याची शक्यता आहे.

भंगार बाजाराच्या प्रश्नावर शिवसेनेच्या आक्रमक भुमिकेमुळे तसेच दिलीप दातीर यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद मतदारांनी दिला होता. मात्र, दिलीप दातीर यांनी पक्षांतर केल्याने मतदारांची ती ताकद सोबत राहते काय? याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या धनुष्य निशाणीसोबत नसल्याने त्याचा फायदा विरोधकांंना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेच्या तिकीटावर लढत असले तरी दिलीप दातीर यांच्या वैयक्तीक संपर्कावरच विजयाचा दावा केला जात आहे.

राज्यात सरकार असलेल्या शिवसेनेच्या निशाणीवर मधुकर जाधव निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. त्यांचा जाधव संकुलातील गोतावळा, मित्रपरिवार, त्यांना पक्षाच्या निशाणीची मिळालेली ताकद व दोन्ही मित्रपक्षांची मिळालेली साथ या बळावर विजयी निश्चित असल्याचा विश्वास शिवसैनिक व्यक्त करीत आहेेत.

माकपाचे माज नगरसेवक तानाजी जायभावे, अ‍ॅड. वसुधा कराड व सचिन भोर यांचा मतदारसंघ या प्रभागात आहे. मोहन जाधव हा सामान्य कार्यकर्ता उमेदवार दिल्याने कामगार वर्गाची सहानुभुती त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तीनही माजी नगरसेवकांच्या स्वत:च्या संपर्काचाही फायदा मोहन जाधव यांना मिळण्याची शक्यता आहे.

भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका अहिरे यांनी प्रभागात केलेल्या कामांच्या बळावर कैलास अहिरे यांनी विजयाचा दावा केला आहे. विद्यमान नगरसेविकेचा प्रभागच असल्याने मतदारांशी जोडलेली नाळ, प्रभागात केलेली कामे या बाबी त्यांना निवडणुकीत उपयोगी पडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या