Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व शिवसेनेत जुंपली; महासभेचा निर्णय आयुक्तांच्या कोर्टात

करोनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व शिवसेनेत जुंपली; महासभेचा निर्णय आयुक्तांच्या कोर्टात

नाशिक । प्रतिनिधी

जगभरात थैमान घालणार्‍या करोना विषाणुचा मोठा फटका देशाला बसत असून महाराष्ट्रातील करोना बाधीतांचा आकडा दररोज वाढत आहे. देशातील करोना बाधितांचे मृत्युचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी असले तरी रुग्णांचा वाढता आकडा सर्वांसाठी चिंतेचा बनला आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात शासनाने सभा, बैठका घेण्यास मनाई केलेली असतांना महापालिकेची महासभा घेण्याचे महापौरांनी जाहीर केल्यानंतर सत्ताधारी भाजप विरुध्द शिवसेना यांच्यात महासभा घेण्यावरुन चांगलीच जुंपली आहे.

- Advertisement -

महासभा घेण्यासंदर्भातील निर्णय महापालिका आयुक्तांनी घ्यावा असे स्पष्ट करीत जिल्हाधिकार्‍यांनी आता निर्णयचा चेंडु आयुक्तांच्या कोर्टात टाकला आहे. यामुळे आता आयुक्तांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष लागले आहे.

देशभरात करोना विषाणुच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून यात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असुन यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यु हे महाराष्ट्रात झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात महामारीला तोंड देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडुन नवीन नवीन उपाय योजना व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या जात आहे.

केंद्रासह राज्य शासनाच्या कॅबिनेटसह इतर बैठका व सभांना बंदी घालण्यात आलेली असून आपत्तकालीन स्थिती लक्षात घेऊन संपुर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची महासभा महापौर सतिश कुलकर्णी यांनी येत्या २० मे रोजी शहरातील सामाजिक अंतराचा नियम पाळला जावा म्हणुन महाकवी कालिदास कलामंदिरात बोलविली आहे. सलग दोन महासभा न झाल्यास महापौर, उपमहापौरांवर कारवाई होऊ शकते व पद देखील जाऊ शकते, म्हणुन ही महासभा सत्ताधारी भाजपकडुन बोलविण्यात आली, असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडुन महासभा घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती.

महापालिका सत्ताधारी भाजपकडुन करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचा नियम पाळत महाकवी कालिदास कलामंदीरात महासभा घेतली जाईल असे स्पष्ट करीत जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. या सत्ताधारी भाजपच्या पत्रावर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी उत्तर पाठविले आहे. यात त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सभा , बैठका घेण्यास मनाई केली असल्याचे नमुद करीत, याचा सारासार विचार करावा. तसेच महासभा घ्यायची किंवा नाही याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेचा असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महापालिका महासभा घेण्याचा निर्णय आता महापालिका आयुक्तांना घ्यावा लागणार आहे. यामुळे आता करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण पाहता आता आयुक्त महासभा घेण्यासंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

महासभा म्हणजे धोक्याची घंटाच – बोरस्ते
नाशिक महानगरपालिकेच्या महासभेला १२७ नगरसेवक, पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, त्यांच्या वाहनाचे चालक व कर्मचारी अशाप्रकारे मोठी उपस्थितीअसते. कालिदास कलामंदिरात यानुसार मोठी गर्दी होईल. सध्याच्या स्थितीत याप्रकारे सभा बोलविणे ही धोक्याची घंटा ठरु शकते. तेव्हा पंधरा दिवसांनी ही महासभा घेतली तरी काही फरक पडणार नाही. मात्र महापौर, उपमहापौरांची पदे वाचविण्यासाठी महासभेचा आग्रह धरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

शहर विकासासाठीच महासभा – महापौर
शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी चांगल्या प्रकारे उपाय योजना केल्या जात असुन यामुळे शहरातील बाधीत रुग्णांची संख्या कमी आहे. पावसाळापुर्व कामांसह शहर विकासांच्या कामांसाठी महासभा बोलविण्यात आली आहे. सध्याची स्थिती लक्षात घेऊन सर्व नियम पाळून या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. आम्ही आता आयुक्तांशी चर्चा करुन महासभेबाबत निर्णय ंहोईल, असे महापौर सतिश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या