Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

कांदा उत्पादकांच्या थकित रक्कमेबाबत शरद पवारांनी लक्ष घातले; दिल्लीत कृषी अधिकार्‍यांची बैठक घेणार

Share

मालेगाव । प्रतिनिधी

मुंगसे केंद्रावर कांदा विकणार्‍या शेकडो शेतकर्‍यांच्या थकित रक्कमेचा विषय गंभीर व धक्कादायक असल्याचे दिसून येत आहे. याप्रश्नी आपण लक्ष घातले असून दिल्ली येथे गेल्यावर तुम्हाला बोलवून घेत केंद्रीय कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून शेतकर्‍यांना थकित रक्कम मिळण्याच्या दृष्टीकोनातून हा विषय मांडू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिक जिल्हा दौर्‍यावर आले असता मालेगावी थकित कांद्याच्या रक्कमेबाबत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या बिर्‍हाड आंदोलनाकडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी त्यांचे लक्ष वेधले. याची दखल घेत पवार यांनी मामको बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांना बोलवून घेत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत माहिती घेतली.

बाजार समितीच्या मुंगसे विक्री केंद्रावर सुमारे ६८१ शेतकर्‍यांनी २ कोटी २१ लाख १५ हजार ३१५ रूपये रक्कमेचा कांदा विकला होता. व्यापार्‍याने शेतकर्‍यांना दिलेले धनादेश बँकेत न वटले नाही. समितीने मालमत्ता जप्त करून तसेच व्यापार्‍याकडून काही रक्कम वसुल करत तिचे वाटप शेतकर्‍यांना केले. मात्र विकलेल्या कांद्याची ५० टक्केच रक्कम शेतकर्‍यांना समितीतर्फे देण्यात आली परंतू १०० टक्के रक्कम मिळाली अशा पावतीवर त्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या.

पुर्ण पैसे मिळाले नसतांना समितीतर्फे पैशाचे वाटप केले गेल्याचे सांगितले जात असल्याने शेतकर्‍यांनी कांद्याची पुर्ण रक्कम मिळाली नसून ५० टक्के रक्कम अद्याप बाकी असल्याचे प्रतिज्ञापत्र उपनिबंधकांकडे करून दिले आहे. परंतू समितीतर्फे हे मान्य केले जात नाही. होत असलेल्या अन्यायाची यंत्रणा दखल घेत नसल्याने कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे हे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याची माहिती भोसले यांनी पवारांना देत या विषयासंदर्भात संपुर्ण कागदपत्र असलेली फाईल सादर केली.

विकलेल्या कांद्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळालेली नसल्याच्या तक्रारीत दिवसेगणिक वाढ होत आहे. मालेगाव येथील प्रकार तर गंभीर असल्याने याप्रश्नी आपण लक्ष घालणार आहोत. राज्याचा दौरा आटोपून दिल्ली येथे गेल्यावर तुमच्यासह शेतकर्‍यांना बोलवून घेत केंद्रीय कृषि विभागाच्या अधिकार्‍यांकडे हा प्रकार मांडून शेतकर्‍यांना थकित रक्कम कशी मिळेल यासाठी निश्चित पाठपुरावा करू,असे आश्वासन पवार यांनी भोसले यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांना दिले

यानंतर पवार यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात उमेदवारीबाबत पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. स्थानिक कोअर कमेटी आघाडीच्या एका उमेदवाराचे नाव निश्चित करून पाठविणार आहेत. वरिष्ठ पातळीवर त्यावर निर्णय घेतला जावा. आम्ही सर्व त्याच्या पाठीशी राहू, अशी माहिती भोसले यांनी दिली.

यावेळी आ. हेमंत टकले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष संदीप पवार, गुलाबराव चव्हाण, प्रशांत पवार, विजय दशपुते, अशोक ह्याळीज, चेतन देवरे, माधवराव पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: कांद्याच्या थकित रक्कमेबाबत लक्ष घातले आहे. दिल्ली येथे या संदर्भात ते अधिकार्‍यांची बैठक देखील घेणार असल्याने कांदा उत्पादकांना निश्चित न्याय मिळेल.
राजेंद्र भोसले
मामको बँक संचालक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!