एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळही अनेक पावले उचलत आहे. याचाच भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार्‍या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ (३० एप्रिलपर्यंत)देण्यात आली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली एसटीने आपल्या प्रवाशांना व कर्मचार्‍यांना संभाव्य संसर्ग होऊ नये म्हणून विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बस स्थानकावरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या हेतूने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार्‍या एसटीच्या सवलत स्मार्ट -कार्डची मुदत ३१ मार्च ऐवजी एक महिना वाढवून ३० एप्रिल अशी करण्यात आली आहे.

त्यामुळे स्मार्टकार्ड घेणार्‍या ज्येष्ठांनी या ३१ मार्चपर्यंत स्मार्ट कार्ड घेण्यासाठी घाई गडबड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.सध्या एसटी महामंडळाच्या २५० आगारांमध्ये तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खासगी वितरकांमार्फत ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेली स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. परंतु करोना विषाणूच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून १ एप्रिल नंतर उर्वरित ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची व्यवस्था पूर्ववत करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत जुन्या पद्धतीनुसारच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com