Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

करोना प्रतिबंधासाठी एसटी महामंडळ सज्ज

Share
करोना प्रतिबंधासाठी एसटी महामंडळ सज्ज; MSRTC ready to prevent of corona

स्थानकांवर उद्घोषणा, जनजागृती

नाशिक ।  प्रतिनिधी

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून बसस्थानकांवर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्थानकांमध्ये उद्घोषणा करणे, सोशल मीडियावरून जनजागृती करण्यावरही भर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सर्व एसटी स्थानकांवर या संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात ६०८ बसस्थानकांपैकी ५५० वापरात असलेल्या बसस्थानक, प्रसाधनगृह आणि एसटी परिसरात स्वच्छता राखावी. प्रसाधनगृहांची स्वच्छता करताना जंतूनाशकांचा वापर करावा, अशी सूचना एसटी महामंडळाने केली आहे. स्थानकांसह आगार, कार्यशाळा या सर्व ठिकाणी कोरोना बचावासाठी ७ कलमी उपाययोजना राबवण्याचे आदेश एसटी मुख्यालयातून सर्वच विभाग नियंत्रकांना आहेत. यात श्वसन संस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे, वेळोवेळी व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, नाक-डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये, अर्धवट शिजलेले-कच्चे अन्न खाऊ नये, हस्तांदोलन टाळा, जंगली आणि पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळावा, या उपाययोजनांचा समावेश आहे.

यात्रा उत्सव स्थगित
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्यातील यात्रा, उत्सव स्थगित करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. होळीपासून पाच दिवसांवर सैलानी बाबांचा संदल असतो. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्रप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या सर्व भागांतून सुमारे ८-१० लाख भाविक येतात. या यात्रेसाठी महामंडळाकडून हजारो विशेष एसटींचे नियोजन करण्यात येणार होते.

रेल्वेही सज्ज
रेल्वे स्थानकातील उद्घोषणा यंत्रणेतून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवा, वापरण्यात आलेले टिश्यू पेपर त्वरित बंद कचर्‍यांच्या डब्यात टाका असे संदेश देण्यात येत आहे. रेल्वेच्या रुग्णालयांना देखील पूर्णपणे सज्ज राहण्याचे आदेश रेल्वे मंडळाकडून देण्यात आले आहे.

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!