विद्यार्थ्यांसाठी वेळांचे रास्त नियोजन करा; अनिल परब यांची एसटी महामंडळाला सूचना

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक ।  प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामीण व निमशहरी भागात शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा उपयोग करतात. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता यावे यासाठी एसटी बससेवेच्या विभागीय अधिकार्‍यांनी रास्त नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटी बस सेवेकडे पाहिले जाते. ही सेवा ग्रामीण भागात प्रवाशांना सुरळीतपणे सहज उपलब्ध असली पाहिजे यावर भर देण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक सेवेची क्षमता अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेला चांगली वाहतूक सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे परब यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास करतात. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी शाळा, कॉलेजच्या वेळेत एसटीबस सेवा उपलब्ध असली पाहिजे. याचा विचार करून वेळेत बससेवा देण्यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही.

महामंडळाने उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीच्या माध्यमातून कमी खर्चात चांगल्या योजना तयार करून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह उत्तम सेवा कशी देता येईल याचाही विचार करावा. जनतेच्या सेवेसाठी महामंडळाला शासन सहकार्य करेल. प्रवाशांच्या व कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनस्तरावर योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *