सावधान ! विनातिकीट बसमधून प्रवास कराल तर?
Share

नाशिक । प्रतिनिधी
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्या फुकट्यांना आता नव्या नियमानुसार दंडासह १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. हा निर्णय महामंडळाने नुकताच घेतला असून विनातिकीट प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशाला आता १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरावा लागणार आहे. याबाबतचे आदेश महामंडळाने एसटीच्या सर्व विभागीय कार्यालयांंना दिले आहेत.विविध भागांत एसटी बसमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेत विनातिकीट आढळणार्या प्रवाशांकडून किमान १०० तर जास्त तिकीट दर असलेल्यांकडून तिकिटाच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारली जाते.
पूर्वी या रकमेवर जीएसटी कराची आकारणी होत नव्हती. परंतु एसटी महामंडळाकडून नव्या निर्णयानुसार दंडासह १८टक्के जीएसटी आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक विनातिकीट प्रवाशाला आता दंडापोटी १०० रुपयांचे तिकीट असलेला मार्ग असल्यास करापोटी २० रुपये द्यावे लागतील. शंभराहून जास्त दराच्या तिकिटाचा मार्ग असल्यास त्याहून दुप्पट दंड द्यावा लागणार आहे. दरम्यान, नव्याने काढण्यात आलेल्या आदेशनुसार एसटीच्या विभागीय कार्यालयांंकडून काम केले जाणार आहे.
विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशाकडून आता दंडाची रक्कम आणि जीएसटी घेतला जाणार आहे.
नितीन मैद, विभाग नियंत्रक, नाशिक विभाग.