Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आसन, शयनयान असलेल्या वीस बसेस दाखल; दोनशे गाड्यांची बांधणी होणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

महामंडळाच्या बसेसमधून रात्रीचा प्रवास करणार्‍या प्रवाशांचा प्रवास आता अधिकच सुलभ आणि आरामदायी होणार आहे. आसन, शयनयान अशा दोन्ही सुविधा असलेल्या नव्या कोर्‍या वीस एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मुंबईहून सुटणार्‍या आणि मुंबईकडे येणार्‍या रातराणीच्या जागी या एसटी बसेस धावणार आहेत. येत्या काळात अशा प्रकारच्या दोनशे बसेसची बांधणी केली जाणार आहे.

रात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांना शयनयान वातानुकूलित एसटी बसचे तिकीट दर परवडत नाहीत. यामुळे विनावातानुकूलित शयनयान बस बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. नवीन बसमध्ये तिकीट दर निमआराम बसप्रमाणेच असल्याचे बोलले जात आहे. ३० आसन आणि १५ शयनयान अशी एकूण ४५ आसने या बसमध्ये आहेत. आरामदायी आसनांसह सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, प्रवाशांसाठी स्वतंत्र छोट्या आकाराचा फॅन, हॅण्डरेस्ट अशा सुविधा बसमध्ये देण्यात आल्या आहेत.

गुजरात एसटी महामंडळाच्या धर्तीवर ही बस बांधण्यात आली. ही बस राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालकीची आहे. सध्या वीस गाड्यांचा पहिला टप्पा महामंडळात दाखल झाला असून अशा प्रकाराच्या एकूण दोनशे गाड्या बांधण्यात येणार आहेत. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी)च्या मंजुरीनंतर या नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २० जानेवारी २०१८ रोजी अत्याधुनिक वातानुकूलित शिवशाहीसोबत विनावातानुकूलित शयनयान एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा केली होती. डिसेंबरअखेर प्रवाशांना या बसमधून प्रत्यक्ष प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!