Type to search

एसटीतील वायफायला… बाय बाय

Featured maharashtra नाशिक

एसटीतील वायफायला… बाय बाय

Share
नाशिक | प्रतिनिधी
एसटीपासून दुरावत चाललेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने १७ हजारपेक्षा जास्त बसेसमध्ये वायफाय सेवा सुरू केली होती. मात्र अवघ्या दोन वर्षांतच ही सेवा गुंडाळण्याची नामुष्की महामंडाळावर ओढवली आहे.
वायफायकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने तोटा वाढत चालला असल्याची सबब देत ही सेवा बंद करत असल्याचे ‘पत्र’ संबंधित कंपनीने एसटी महामंडळाला दिले आहे. त्यामुळे एसटीला दरवर्षी मिळणार्‍या एक कोटी रुपयांच्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार आहे.
एसटीचे तोट्यातील चाक अधिकच गाळात रुतू लागले असून तोटा कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे. खासगी वाहतुकीचे एसटीपुढे मोठे आव्हान असून एकेकाळी उन्हाळ्यात पूर्ण भरणार्‍या बसेसमध्ये आता नगण्य प्रवासी असतात.
त्यामुळे एसटी प्रशासनाकडून दरवर्षी ‘प्रवासी वाढवा’ अभियानही चालवले जाते. तरीही प्रवाशांची संख्या वाढत नसल्याचे चित्र आहे. एसटीच्या ताफ्यात शिवशाही बसेस आणून एसटीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हा प्रयत्नही तितकासा यशस्वी झालेला नाही.
एसटीच्या तब्बल १७ हजार बसेसमध्ये एका मीडिया सोल्युशन कंपनीतर्फे हॉटस्पॉट वायफाय बसवण्यात आले होते. कंपनीसोबत तीन वर्षांचा करार करण्यात आला होता. वायफायच्या माध्यमातून प्रवासादरम्यान काही सिनेमे तसेच अन्य मनोरंजन कार्यक्रम पाहण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली होती.
वायफायची संपूर्ण यंत्रणा कंपनीची असून यासाठी एसटी महामंडळाला काहीही खर्च करावा लागला नाही. उलट करारानुसार कंपनीच एसटी महामंडळाला वर्षाला एक कोटी रुपये देत होती.
अनेक एसटी बसमधील वायफाय यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांचा हिरमोड होऊ लागला. त्यातच हल्ली कमी पैशांत अनलिमिटेड मोबाइल इंटरनेट डेटा मिळत असल्याने रडतखडत चालणार्‍या एसटीच्या वायफाय सुविधेचा वापर करण्याकडे प्रवासी पाठ फिरवू लागले.
त्यामुळे एसटी बसमधील वायफाला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने या मीडिया सोल्युशन कंपनीला परवडेनासे झाले. त्यामुळे या कंपनीने अखेर एसटी बसमधील वायफायची सेवा बंद करत असल्याचे प्रशासनाला लेखी कळवले आहे. त्यामुळे केवळ दोन वर्षांतच ही सेवा अस्ताला गेली असून सध्या अनेक बसमधील वायफाय यंत्रणा काढून टाकण्यात आली आहे, तर काही बसमध्ये ही यंत्रणा आहे.
ही सुविधा प्रवाशांना इंटरनेट हाताळण्यासाठी नव्हती. त्यावर निर्बंध होते. कंपनीकडूनच वायफायमधून करमणुकीसाठी ठराविक गाणी, चित्रपट, मालिका व अन्य मनोरंजन सेवा दिली जात होती. त्याशिवाय प्रवाशांना पर्याय नव्हता. सर्व बसगाड्यांमध्ये सुविधा दिल्यानंतर करारानुसार कंपनीकडून एसटीला प्रत्येक वर्षी एक कोटी रुपये प्रीमियम मिळत होते. मात्र प्रवाशांसाठी सुरू केलेल्या वायफायला प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!