कॅन्सरच्या संशोधनावर मोतीवाला कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

0
नाशिक  | प्रतिनिधी  कर्करोगावर उपचार करणार्‍या विविध पॅथींमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विशेषज्ञांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१५) ते रविवार(दि.१७)या कालावधीत इंटरनॅशनल सेमिनार ऑन होमिओपॅथी ऍन्ड ऑक्सिलरी थेरीपीज इन ऑनकोलॅाजी ‘इशातो २०१९’ या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे डॉक्टर व शास्त्रज्ञ कॅन्सरवरील उपचार व संशोधनाबाबत संवाद साधणार आहेत.
विशेष म्हणजे आयुर्वेद, ऍलोपॅथी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी प्राणी खिलीन पॅथी अशा वेगवेगळ्या उपचार प्रणालींना या निमित्ताने प्रथमच एका व्यासपिठावर आणण्याचे शिवधनूष्य मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज व हॉस्पिटलने उचलले असल्याचे मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एफ.एफ.मोतीवाला यांनी सांगितले.
कर्करोगाच्या उपचारासाठी विविधांगी उपचारपद्धती व सकारात्मक दृष्टीकोनही आवश्यक आहे. कर्करोगावरील उपचारात होमिओपॅथी व इतर सहाय्यकारी उपचार पद्धतींचा शास्त्रीय दृष्टीकोन, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी, संशोधक यांच्यात संशोधनाची जिज्ञासा निर्माण करणे व ती वृध्दींगत करणे, तसेच कर्करोगावर होमिओपॅथिक औषधोपचार हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एफ.एफ. मोतीवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही परिषद श्रीमती झुबी मोतीवाला सभागृह, मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, नाशिक येथे ही परिषद होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कर्करोगावर उपचार करणार्‍या अनेक डॉक्टरांचा सहभाग हे या परिसंवादाचे वैशिष्ट आहे. या परिसंवादाच्या माध्यमातून कर्करोगाबाबतची व त्यावरील विविधांगी औषधोपचार पद्धतीची माहिती संबंधीतांपर्यंत पोहचणार आहे.
परिसंवादाची एक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. परिसंवादाचा जास्तीत-जास्त जिज्ञासूंनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.मोतीवाला यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस उपप्राचार्य डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. सहान मोतीवाला, डॉ. रिटा कुंडू, डॉ. तमस कुंडू, डॉ. सुभाष यादव, कुलसचिव रमेश बोडके, डॉ. वैशाली झोडगेकर, डॉ. सचिन भालेराव, ऍड. पल मोतीवाला उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या चर्चासत्रात कॅन्सर या आजारावर ऑस्ट्रेलियाच्या डॉ. मॅन्युअल बॉयल(निसर्गोपचार पद्धती), बेल्जिअमहून डॉ. गॅय कोकेनबर्ग (होमिओपॅथी व कॅन्सर), मुंबईतील प्रख्यात होमिओपॅथिक तज्ञ डॉ. फारुख मास्टर व डॉ. अन्वर अन्सारी (कॅन्सर वरील होमिओपॅथी उपचार पद्धती), कॅन्सर व अन्य दुर्धर आजारांवर यशस्विरित्या उपचार करणारे निष्णात डॉ. सुनिर्मल सरकार हे पश्चिम बंगालवरुन येणार आहेत.
कोलकाता येथून बोस इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ डॉ. तनया दास व डॉ. गौरीशंकर सा (कॅन्सरवरील संशोधन जागरुकता), तसेच नाशिकचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. राज नगरकर आणि मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य तथा जर्मन न्यू मेडिसीनचे विशेषज्ञ डॉ.एफ.एफ.मोतीवाला यांचे विशेष मार्गदर्शन या परिसंवादामध्ये लाभणार आहे.या परिषदेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीही सलग तीन दिवस उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*