Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बिबट्यांवर आधुनिक पद्धतीने उपचार; देशातील पहिल्या बिबट रूग्णालयाचा नाशिकला फायदा

Share

नाशिक । प्रतिनिधी

अनेकदा योग्य आणि वेळेत उपचार न मिळाल्याने बिबट्यांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, आता बिबट्यांवर नियमित आणि योग्य उपचार व्हावेत, यासाठी देशातील पहिले सुसज्ज असे रुग्णालय पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून ७ किमी अंतरावर असलेल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रामध्ये साकारले जात आहे. नाशिकमध्ये बिबट्यांचा आधिवास जास्त प्रमाणात असून येथे बिबट्यांना अपघातात व जेरबंद केल्यावर जखमा होतात. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी या रूग्णालयाचा विशेष फायदा होणार आहे.

राज्य सरकारकडून मिळालेल्या दोन कोटी रुपयांच्या विशेष निधीतून त्याची उभारणी सुरू आहे. सध्या रुग्णालयाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या मार्चपासून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. बिबट्यांवरील शस्रक्रियेपासून विविध प्रकारचे उपचार करण्याची सुविधा येथे असणार आहे; तसेच बिबट्यांच्या जनुकीय तपशीलाचे पृथक्करण करणारी ‘पीसीआर’ यंत्रणादेखील येथे बविण्यात येत आहे. भारतीय वन्यप्राणी प्राधिकरणाकडून रुग्णालय उभारणीचे तांत्रिक अवलोकन केले जात आहे. रुग्णालयाचे नियमन महाराष्ट्र वन्यप्राणी प्राधिकरणाकडून होणार आहे.

राज्यात विविध ठिकाणी अनेक बिबटे जखमी होतात. यामध्ये त्यांच्या पाय किंवा शरीराला इजा होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरदेखील करण्यात येणार आहे. अगदीच स्नायू दुखावलेले, पक्षाघात झालेल्या बिबट्यांवर लेझर उपचार करण्यासाठी लेझर मशिन असणार आहे. मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांत जेरबंद केलेले बिबटे अनेकदा पिंजर्‍याच्या लोखंडी सळ्या तोडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्यांच्या दात किंवा हिरड्यांना इजा होते. त्यामुळे अशा दातांचे आजार झालेल्या बिबट्यांवर उपचार करण्यासाठी डेंटल कीट उपलब्ध असणार आहे.

या रुग्णालयामधून उपचाराच्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. त्यामध्ये रक्ताची तपासणी करण्यासाठी ब्लड अ‍ॅनालायझर, पक्षाघात झालेल्या बिबट्यांवरील उपचारासाठी अ‍ॅक्युपंक्चर मशिन, बॅटरीवर चालणारे आणि कुठेही जखमी किंवा जायबंदी झालेल्या प्राण्यांच्या हाडांचे फोटो काढण्यासाठीचे पोर्टेबल एक्स रे मशिन, सूक्ष्मदर्शक, सोनोग्राफी मशिन, भूल देण्यासाठीचे मशिन, आपरेशन थिएटर , ओपीडी अशा विविध आधुनिक उपचार आणि निदानाची सामुग्री उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या येथे वाइल्डलाइफ ‘एसओएस’ संस्थेचे एक मुख्य वैद्यकीय अधिकारी, एक सहायक, तर ८ कर्मचार्‍यांची उपलब्धता असेल. वन विभागाचे चार कर्मचारी यासाठी कार्यरत असतील. तांत्रिक प्रयोगशाळा सहायक; तसेच प्राणीतज्ज्ञांच्या जागादेखील यासाठी भरण्यात येणार आहेत.

दृष्टिपथात रुग्णालय
रुग्णालयात ओपीडी हॉल, ऑपरेशन थिएटर, जखमी बिबट्यांसाठी चार वॉर्ड, पॅथॉलॉजी लॅब, औषधे ठेवण्याची खोली, इन्सुलेटर रुम (प्राण्यांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवणारी खोली), वैद्यकीय अधिकार्‍यांच्या केबिन, २ डार्क रुम (अत्यंत जोखमीतले प्राणी ठेवण्यासाठीची जागा), एक चेंजिंग रुम, वाइल्डलाइफ ‘एसओएस’ संस्थेकडून वैद्यकीय अधिकारी; तसेच सहायक पशुवैद्यकीय अधिकार्‍यांसह, आवश्यक कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात येणार आहे. वन विभागाचे कर्मचारीदेखील त्यांना साह्य करणार आहेत.

डीएनए पृथक्करण
बिबट्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला किंवा एखादे पशु मारले, तर तेथील रक्ताचे नमुने आणि नंतर जेरबंद केलेल्या बिबट्याचे नमुने यांचे डिएनए पृथक्करण या रुग्णालयामध्ये करता येईल. त्यामुळे हल्ला करणार्‍या बिबट्याचा शोध घेणे शक्य होणार आहे.

नाशिकमध्ये बिबट्या आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. बिबट्या-मानव संंघर्षाच्या घटनाही घडल्या आहेत. या आधुनिक रूग्णालयाचा नाशिकच्या वनक्षेत्रातील गंभीर जखमी बिबट्यांना नक्कीच फायदा होईल. वन विभागाकडे आवश्यक अ‍ॅम्बुलन्स असून, आम्ही अत्याधुनिक ट्रांन्झिट व्हॅनचीही मागणी केली आहे.
तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, नाशिक पूर्व.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!