Friday, April 26, 2024
Homeनाशिकबेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला

बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला

नाशिकरोड । प्रतिनिधी

दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ६२ वर्षाच्या महिलेचा खून झाल्याची घटना जेलरोडच्या दुर्गामंदिर परिसरात उघड झाली आहे. या महिलेचा मृतदेह खुल्या भूखंडावर पोत्यात भरलेला होता. महिलेचा खून कोणी व का केला याबाबतचे रहस्य अद्याप उलगडले नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

या महिलेचा मुलगा सचिन वसंतराव पाटील (३४), रा. दुर्गामाता मंदिरासमोर, जेलरोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १ फेब्रुवारीला सकाळी आठच्या सुमारास सचिन पाटील यांची ६२ वर्षाची आई मंदाकिनी पाटील (मेधने) ही ब्लाऊज पीस घेण्यासाठी नाशिकरोड येथे जाऊन येते असे सांगून गेली. परंतु ती पुन्हा आलीच नाही. कुटुंबियांनी शोध घेऊन त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी रात्री अकराच्या सुमारास उपनगर पोलिसांत आई हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली.

(दि.११) सकाळी साडेआठच्या सुमारास पाटील यांच्या घरासमोरील दुर्गामाता मंदिराजवळील धनराजनगरमधील भूखंडातून दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सचिन पाटील हे भाऊ संदीपसह तेथे गेले असता बारदानाची गोणी पडलेली दिसली. त्यातूनच दुर्गंधी येत होती. नागरिकांनी पोलिसांना फोन करुन बोलावले. पोलिस ही गोणी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी गोणीचे तोंड उघडले असता त्यात महिलेचा मृतदेह आढळला. पाटील कुटुंबियांनी मृतदेहावरील साडी, सोन्याच्या बांगड्या व कर्णफुले पाहून हा मृतदेह मंदाकिनी पाटील यांचाच असल्याचे सांगितले.

उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून कोणी व कोणत्या कारणासाठी पाटील यांचा खून केला याचा तपास सुरु केला आहे. जेलरोडला पती पत्नीच्या वादात पाच वर्षाच्या मुलाच्या डोक्यात लाकडी बॅट घालून त्याचा खून पित्याने केल्याच्या प्रकाराला चोवीस तास उलटत नाही तोच उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दुसर्‍याच दिवशी पुन्हा खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अचंबित झाले आहेत.

दरम्यान बेपत्ता मंदाकिनी पाटील हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित महिला कोणाला आढळल्यास त्यांना सुखरूप घरी आणणार्‍यास रोख रकमेचे बक्षीस देण्याचे सोशल मीडियाद्वारे आवाहन केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या