Friday, April 26, 2024
Homeनाशिकराष्ट्रसेवा दलातर्फे उद्या अहिराणी जागर

राष्ट्रसेवा दलातर्फे उद्या अहिराणी जागर

मालेगाव । प्रतिनिधी

येथील राष्ट्रसेवा दलातर्फे विभागस्तरीय अहिराणी भाषेचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, रविवार (दि. ८) डिसेंबर रोजी या. ना. जाधव विद्यालयात होणार्‍या या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.सानेगुरूजींच्या आंतरभारती संकल्पनेनुसार नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यातील अहिराणी भाषिकांचा मेळावा व अहिराणी भाषेचा जागर करण्याचा निर्णय येथील राष्ट्रसेवा दलातर्फे घेण्यात आला आहे. हा संपुर्ण कार्यक्रम अहिराणी भाषेतच संपन्न होणार आहे.

- Advertisement -

रविवारी सकाळी ७.३० वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. पहिल्या सत्रात बागलाणचे अहिराणी साहित्यीक डॉ. सुधीर देवरे अहिराणी भाषेची सद्यस्थिती तर अहिराणी नाटककार बापूसाहेब हटकर हे अहिराणीचा संपुर्ण इतिहास या विषयावर मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी उपस्थित राहतील.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात दुपारी २ ते ४ दरम्यान अहिराणी लोककलांचा जागर केला जाईल तर तिसर्‍या सत्रात ४ ते ५ दरम्यान अहिराणी भाषादिनाचा ठराव मांडण्यात येईल. धुळ्याचे ‘खान्देशनी वानगी’ वृत्तपत्राचे संपादक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप होईल. अहिराणी भाषेचा या जागर सोहळ्यात ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडणार असून त्यासाठी महिनाभरापासून सेवादल कार्यकर्ते नियोजन करीत आहेत. त्यासाठी पालखी समिती, भोजन समिती, उद्घाटन सत्र समिती, लोकजागर समिती, नोंदणी समिती, मंडप व व्यवस्थापन समिती, सत्कार समिती आदी समित्या तयार करण्यात आल्या आहेत.

शहरातील विविध संस्था-संघटना, समविचारी कार्यकर्ते व अहिराणीप्रेमी नागरीकांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले असून राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुका कार्याध्यक्ष विकास मंडळ, राज्यसचिव नचिकेत कोळपकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या