Type to search

Featured maharashtra नाशिक

Video : देशदूत ग्राउंड रिपोर्ट : दुष्काळाचे सामाजिक दुष्परिणाम

Share

मालेगाव/बागलाण | डॉ. वैशाली बालाजीवाले

जिल्ह्यातील दुष्काळ तीव्र होत असताना मालेगावची परिस्थिती काही वेगळी नाही. उष्णतेने हैराण झालेली प्रजा आणि त्यात पाण्याची वानवा.
‘देशदूत’ची टीम मालेगाव-बागलाणच्या दुष्काळ दौर्‍यावर गेली असताना बघितलेले चित्र तीव्र पाणी टंचाईचेच दिसले.

मेहुणे गावात टँकर आलेला असताना गाव हंडे, बादल्या, भांडे घेऊन पाण्यासाठी जीव काढत लोटताना बघितले. मध्ये नदी आणि दोन बाजूला वसलेले मेहुणे. नदीच्या पलीकडे शासनाने बांधलेला आहळ (कुंड) त्यात सोडण्यात येणार टँकरच पाणी. हा टँकरदेखील १५ दिवसांतून एकदा येतो. ज्यांच्या भागात हे कुंड आहे साहजिकच पाणी भरण्यासाठी त्यांचेच वर्चस्व. दुसर्‍या बाजूचे लोक बादल्या हातात घेऊन लांब उभे राहून वाट बघतात की आपल्याला पाणी भरायला संधी तरी मिळेल का नाही म्हणून. आमच्या भागात कुंड झाले तर पाणी मिळेल याच निष्कर्षावर ती पोहोचलेली.

पिण्याच्या पाण्यासाठी मात्र सर्व गावकर्‍यांनी पैसे मोजावे लागतात. आणि हे पाणीदेखील पाच-दहा किलोमीटर दूर असलेल्या मालेगाव शहरातून आणावे लागते. प्रायव्हेट टँकर आलाच, तर पैसे देऊन ड्रम भरून घ्यायचा. महिलांचे रोजंदारीचे कामदेखील या पाण्याच्या नादात बुडते आणि मनस्ताप होतो तो वेगळाच.

ज्वार्डी गावाची कथाही सारखीच. गावाच्या पारावर वयस्कर आणि तरुण सगळीच मंडळी बसलेली दिसतात. बायका मात्र पाण्याच्या भांड्याजवळ गोळा होता. प्रत्येक दाराच्या पुढे असेल ते भांडे भरलेले दिसतेय. कालच गावात टँकर येऊन गेला आहे; याची ही खूण. थोडे दिवस तरी आता पाणी मिळेल, पण ८-१० दिवस झाले की, पाण्यात किडे दिसू लागतात आणि मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम दिसत आहे अशी तक्रार महिला करतात. पाण्याचे पैसे त्यात दवाखान्याचे पैसे आणि रोजगार नाही ही कसरत करतांना त्यांना नाकी नऊ झाले आहे.

बागलाणमधील चौगावची कथा मात्र थोडी वेगळी आहे. तिथे शेतात थोडी हिरवळ दिसतेय. डाळिंबाचे बाग उभे राहू पाहताहेत. पाणी नसतांना हे कसे शक्य आहे असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. उत्तर मिळते ते बागा टँकरच्या पाण्यावर जिवंत ठेवायचा प्रयत्न होत आहे असे गावकरी सांगतात. या गावात मागील डाळिंबाच्या पिकाने गावकर्‍यांच्या हातात थोडा पैसा दिलाय. त्याच पैशावर आज बाग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चिंता आहे ती एवढे पैसे गुंतवल्यावर येणार्‍या डाळिंबाला भाव मिळेल का नाही.

एकंदरीत परिस्थिती तशी गंभीरच. सगळ्या नद्या कोरड्या. एखाद्याच नदीला मात्र पाणी दिसतेय ते सुद्धा केळझर धरणाच आवर्तन सोडल्याने काही भागांना थोडासा दिलासा मिळाला आहे. बहुतांश भाग मात्र पाण्याची वाट बघतोय. एकीकडे राजकीय पुढारी आपल्या या भागासाठी मोठी स्वप्न बघताहेत. पण मूलभूत असलेले पाण्याची गरज मात्र उपेक्षित राहते. परिसरातील लोकांनी टँकर हा आयुष्याचा एक भाग म्हणून स्वीकारलेला दिसतो. साधारण दिवाळीपासून त्यांची परिस्थिती अशीच आहे असे ते सांगतात. शासन काही करेल अशी त्यांना आशा असली तरी विश्‍वास मात्र वाटत नाही.

मागण्या खूप आहेत त्या अनुदानापासून ते नळाला पाणी यावे, इथपर्यंत पण याकडे कुणी लक्ष देईल असे त्यांना वाटत नाही.प्रजेचा अशा प्रकारचा अविश्‍वास हा कुठल्याही राजासाठी चांगला नाही. पाऊस आणि पाण्याची परिस्थिती आव्हानात्मक असली तरी प्रजेला दैनंदिन जगण्यासाठी सोय उपलब्ध करून देणे; ही जबाबदारी शासकीय यंत्रणेचीच आहे. पाणीपट्टी घेणे हा शासनाचा हक्क आहे तेवढाच रोज पाणी पुरवणे ही त्यांची जबाबदारी. यासाठी प्रशासनाला चाकोरीबाहेर जाऊन विचार करणे गरजेच ठरेल. नदीजोड प्रकल्प, छोटे बंधारे, पाणी आडवा पाणी जिरवा या बाबतचा विचार आता कृतीत उतरायला हवा. तो लवकर कृतीत आला नाही, तर गावाकडील सामाजिक प्रश्‍न हे खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतील.

गावातील आरोग्य सांभाळायचे असेल, तर हागणदारी मुक्त योजनेला फक्त शौचालये बांधून पुरणार नाहीत, तर पाण्याचा वापरही लागेल. पाणी भरून थकलेल्या महिलांच्या आरोग्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे लागेल. तरुणांना रोजगार संधी, शेतीला पाणी, गावातील सलोखा, कुटुंबातील सोहळे, या सगळ्यावर पाणी नसल्याने परिणाम होऊ शकतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.पुढची परिस्थिती लक्षात घेऊन आताच पाऊल उचलणे आवश्यक ठरेल.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!