Type to search

Featured maharashtra नाशिक

फळबागा जगवणे झालाय ‘घरघालू’धंदा

Share

चौगाव | विजय गिते

दुष्काळ म्हटले की, शेतात करपलेली पिके, जळालेल्या फळबागां, भेगाळलेली जमीन! असे विदारक दृश्य पाहायला मिळते. मात्र, ऐन दुष्काळातही बागलाण तालुक्यातील चौगावसह अनेक गावांमधील फळबागा मात्र बहरलेल्या आहेत. हे चित्र डोळ्यांसाठी अगदी सुखद असले तरी बागा जगविणे म्हणजे यांचा घरघालू धंदा होऊन बसला आहे.

दिवसाला प्रत्येकी एका शेतकर्‍याला दोन-दोन हजार रुपये पदरमोड करून पोटच्या पोरागत फळबागा जगविण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. असे विदारक चित्र बागलाण तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे.

बागलाणचा इतिहास पाहता हा तालुका म्हणजे सधन बागायतदारांचा तालुका म्हणून याची ओळख. हरणबारी,केळझर अशा दोन दोन धरणांनी तालुका आणि शेतकर्‍यांना सुजलाम्-सुफलाम् केले आहे.

पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे या तालुक्याला डाळिंबाचा निर्यातदार शेतकरी अशी ओळख आहे.मात्र,दृष्ट लागावी अशी परिस्थिती या तालुक्याच्या काही भागावर ओढवलीआहे.तीन वर्षांपासून तालुक्याच्या अनेक भागावर पावसाने वक्रदृष्टी दाखविल्यामुळे येथील शेतकरी पाण्याअभावी हैराण झाल्याचे चित्र ठिकाणी आहे.

पावसाचे प्रमाण घटल्याने आधीच तेल्या रोगाने हैराण झालेल्या डाळिंब उत्पादकांना शिल्ल्क असलेल्या बागा पाण्याअभावी जगवायच्या कशा? याची चिंता आहे. पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळ पाचवीला पुजल्यागत असल्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. चौगावमध्ये ४०० हेक्टर डाळिंब क्षेत्राबरोबरच शंभर हेक्टर द्राक्ष ही या गावात आहे.

मात्र, येथील शेतकर्‍यांना या फळबागा जगवायच्या कशा त्याला पाणी आणायचे कसे, याची भ्रांत रोज असते.येथील प्रत्येकाकडे ट्रॅक्टर, २ हेक्टर पर्यंत डाळिंब बाग आहे. डाळिंबाला पाण्याचे प्रमाण कमी लागत असले, तरी दुष्काळी परिस्थितीत एका शेतकर्‍याला केवळ पाण्यावर प्रतिदिन दोन हजार रुपये खर्च करावा लागत आहे. त्यामुळे येथील फळबाग उत्पादकांना केव्हा पाऊस पडतो याची चिंता असून ते पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

काही वर्षांचे डाळिंबाचे उत्पादन पाहता दोन पैसे येथील शेतकर्‍यांच्या हाती खुळखुळले आहेत. हीच पुंजी ते आपल्या फळबागा जगविण्यासाठी आता खर्च करत आहेत. डाळिंब उत्पादनातून ८० टक्के खर्च हा फळबागा जगविण्यावर व खत,मोलमजुरीवर होत असून केवळ २० टक्के उत्पादन हाती येत आहे.फळबागांबरोबरच आपली जनावरेही पाळायची कशी अशी चिंताही पशुपालकांना आहे. चाराछावण्या नाही तरी किमान शासनाने जनावरांसाठी गवत व चारा उपलब्ध करून द्यावा,अशी मागणीही ग्रामस्थांची आहे.

गावामध्ये नळपाणी योजना आहे मात्र तिचाही फायदा अत्यंत कमी असल्याचे येथील ग्रामस्थांचेे म्हणणे आहे. ठेंगोडा येथून नवीन नळ पाणी योजना सुरू होईल अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त करतानाच नुकत्याच दुसर्‍यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या सुभाष भामरे योजना मार्गी लागेल अशी त्यांना आशा आहे. पाण्याअभावी अनेक शेतकर्‍यांच्या डाळिंब बागा या सुकल्या असून त्या आता पुन्हा कितीही पाऊस झाला तरी जगणार नाही आणि जगल्याच तर तीस ते चाळीस टक्केच झाडे जगतील, अशी शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

शासनाला शेतकर्‍यांसाठी काहीतरी करावे असे वाटते. मात्र, शासनाकडून जे अनुदान मिळते ते अत्यंत तुटपुंजे आहे. वैयक्तिक शेततळ्यासाठी ५० हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळते.मात्र, त्यात त पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी शेतकर्‍यांना किमान दोन लाखापर्यंत किंवा प्लॅस्टिकचा पूर्ण खर्चाचे अनुदान उपलब्ध करून द्यावे. टँकरला ही अनुदान मिळावे हे दिले तरच आमच्या फळबागा जगतील. फळबागांनाही अनुदान उपलब्ध करून दिल्या शिवाय गत्यंतर नाही.

याबरोबरच डाळिंबावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा आम्हा डाळिंब उत्पादकांना डाळिंब पीक सोडून दुसर्‍या पिकाकडे वळावे लागेल,असे मत चौगावचे सरपंच लक्ष्मण मांडवडे व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशव मांंडवडे यांनी व्यक्त केले तीन वर्षांपासून पावासाचे प्रमाण कमी असल्याने शेतकर्‍यांच्या व्यथा काय आहेत हे ग्रामस्थ सांगतात.

…शासनानेच काहीतरी करावे

बागलाण तालुक्यातील चौगावच्या डाळिंब, द्राक्ष उत्पादकांना शासनानेच आमच्यासाठी काही तरी करावे, अशी भाबडी अपेक्षा आहे. त्यासाठी मग त्यांना टँकर, शेततळे यावर अनुदान मिळण्याबरोबरच चारा, गवत शासनानेच उपलब्ध करुन देऊन मदतीचा हातद्यावा, अशी भोळी अपेक्षा आहे.

बागलाण शहराला लागूनच चौगाव हे गाव वसलेले. पक्की सिमेंटची घरे, प्रत्येक शेतकर्‍याचा दारापुढे डाळींब बागांबरोबरच ट्रॅक्टर, चारचाकी, दुचाकी असा एकूणच सधन कुटुंबाचा डामडौल असणारे चौगाव.े निर्यातक्षम डाळींब उत्पादन घेणार्‍या येथील शेतकर्‍यांना मात्र तीन वर्षांपासून वरूण राजाने पाठ फिरवत दगा दिला. त्यामुळे सधन दिसत असलेला येथील शेतकरी मात्र तीन वर्षांपासून पाणी नसल्याने विचलित झाला आहे.

मोटारीचे बटन दाबले की फळबागेत पाणी, अशी परिस्थिती पाहिलेल्या डाळिंब उत्पादकांना आता ट्रॅक्टरने दोन – दोन, पाच-पाच किलोमीटर वरून टँकरने पाणी आणावे लागत आहे. यासाठी दिवसागणिक दोन दोन हजार रुपये खर्च होत असल्याने येथील शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. डाळिंब उत्पादकांना आता शासनानेच आमच्यासाठी काहीतरी करावे, अशी भाबडी अपेक्षा आहे. शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याबरोबरच शासन टँकर पुरवत नसेल तर टँकरवर अनुदान मिळावे, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ बाळगून आहे.

शासन अनुदानाशिवाय फळबांगांना गत्यंतर नाही. शासनाने डाळिंबावर प्रक्रिया उद्योग सुरू करावे. हे जर केले नाही तर आम्हाला डाळिंब पीकाला फारकत देऊन दुसर्‍या पिकाचा पर्याय उपलब्ध करावा लागेल, असा जणू इशारा येथील शेतकरी शासनाला देऊ पाहत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!