Type to search

आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

शाळेऐवजी पाणी भरण्यासाठी ‘हजेरी’

Share

मेहुणे | दिनेश सोनवणे

मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावात पावसाळा सुरू झाला तरी दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. गेल्यावर्षी भर पावसाळ्यात पाण्याचे टँकर सुरू होते. ही परिस्थिती आजही कायम आहे. सध्या गावात शासनाचे तीन टँकर मंजूर असून पैकी दोन नियमित सुरू आहेत. येथील ग्रामस्थांना पाणी भरण्याशिवाय दुसरे काम नाही. विद्यार्थ्यांना ज्या दिवशी गावात टँकर येणार असेल त्या दिवशी शाळेला स्वयंघोषित सुटी घ्यावी लागते. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांना शाळेवरच पाणी फेरावे लागत आहे.

गावात शिरताच काही मुले समूहाने बसलेली दिसली. काही महिला आपल्या लहान मुलांना घेऊन एका मंदिराच्या आडोशाला सावलीत बसल्या होत्या. वयोवृद्ध आजीबाई आपल्या वृद्ध नवर्‍यासोबत पाण्याची कळशी भरायला आलेल्या होत्या. दुपारच्या उन्हाच्या तडाख्यापासून रक्षण व्हावे, यासाठी आजीबाईने आपले डोके फडक्याने बांधले होते. केव्हा हा पाण्याचा हौद भरेल आणि आपल्याला पाणी मिळेल, याची प्रतीक्षा आजींना होती.

गावात रोजगाराचे साधन नाही, त्यामुळे मालेगावला कामासाठी जावे लागते. मार्केट, सेंट्रिंगची कामे करावी लागतात. जाण्यायेण्यात भाडे, पेट्रोलपाणी जाऊन रोजगारही परवडत नसल्याचे एका व्यक्तीने सांगितले. गावात बीएस्सी, सायन्स, कॉमर्समध्ये पदव्या घेतलेले अनेक विद्यार्थी आहेत. ज्या दिवशी पाण्याचे टँकर येणार, त्या दिवशी हे विद्यार्थी शाळेएवजी पाणी भरण्यासाठी हजेरी लावतात.

गावात तालुक्यातील गिरणा धरण्याच्या फुगवट्याजवळ असलेल्या येसगाव येथील विहिरींवरून पाणी आणण्यात येते. गावात किती दिवसांनी पाण्याच्या टँकरचा चक्कर होतो, असे स्वतः टँकरचालकास विचारले असता, त्याने सांगितले, माझा २२ वा नंबर आहे. टँकर ४० हजार लिटरचे असते. त्यामुळे भरायला वेळ जातो, इतर गावात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. यामुळे नाईलाज असल्याचे त्याने सांगितले.

परिसरात ज्वार्डी, जाटपाडा, निंबायती आणि मेहुणे येथील तहान टँकर भागवत आहेत. अतुल लोढा या सामाजिक कार्यकत्याने आम्ही मेहुणेकर समितीमार्फत गावाच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अपर जिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे व्यथा मांडली. एकुणच येथील जनतेच्या पाचवीला दुष्काळ पुजला आहे. गाव भकास आहे. घरातून किमान एका व्यक्तीच्या हातात पाण्याचा हंडा नियमित दिसतो. शासनदरबारी व्यथा मांडून समस्या सुटाव्यात अशी भाबडी आशा येथील ग्रामस्थांना आहे.

मुलांनी शिक्षण घेतले आहे, पण त्याचा उपयोग कसा करावा, हेच अद्याप उमजत नाहीये. यामुळे तरुणपिढीच्या डोळ्यांतही येथील दुष्काळवजा नैराश्य स्पष्ट दिसून येत आहे. येथील प्रत्येकजण वरुणराजाला साकडे घालत यंदातरी ‘आमचा दुष्काळ घेऊन जा’, अशी विनवणी करताना दिसत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!