Type to search

Featured maharashtra नाशिक

पाणीना पत्ताच नी, समदं कोरडं शे!

Share

ज्वार्डी | भारत पगारे

अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या फेर्‍यात अडकलेला असताना धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुकाही त्याला अपवाद नाही. तालुक्यातील ज्वार्डी बु ॥ गावात दररोजच ४० रुपये मोजून २०० लिटर पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. एकवेळ गावातील छोट्या किराणा दुकानांत मिनरल वॉटरची बाटली मिळते. पण, शासनाकडून लवकर टँकर मिळत नाही, अशी दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे.

येथील महिला भीषण दुष्काळ पाहून त्याची दाहकता सांगताना भावुक होतात. आपसूकच त्यांच्या तोंडातून ‘पाणीना पत्ताच नी, समदं कोरडं शे’, असे वाक्य बाहेर पडते. सर्वत्र पाण्यासाठीची जिवावर बेतणारी लढाई असे चित्र सध्याच्या परिस्थितीत चांगलेच अस्वस्थ करत आहे. पाण्यासाठी डोळ्यात अश्रू, थरथरत्या हातात पाण्याचा हंडा, पाण्यासाठी चाललेली कसरत असे भीषण वास्तव राज्यातील अनेक गावात पाहायला मिळत आहे.

जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या ज्वार्डी बु॥ गावही त्याला अपवाद नाही. गावातील वृद्ध, त्यांचे नातू व पणतू, महिला, मुली दररोज पाण्यासाठी सार्वजनिक पाणवठ्यावर जातात. तेथेच शेजारी शेकडो भांडे, ड्रम, टब, बादल्या व मोठ्या कॅनचा ‘खच’ पडलेला असतो. तसेच पाण्याची आतुरतेने वाट पाहणारे स्थानिक ग्रामस्थही पाण्याच्या टँकरसह पावसाची वाट पाहत वेळ घालवितात. पाण्याचा टँकर येणार आहे, त्यादिवशी महाविद्यालयीन मुलामुलींना अक्षरश: महाविद्यालात जाण्याऐवजी पाणी भरण्यासाठी ‘टप्पा’ मारावा लागतो.

या गावातील नळयोजनेतून केव्हातरीच पाणी येते. तसेच खासगी ठिकाणाहून पाणीदेखील ४० रुपये खर्च करून २०० लिटर इतकेच मिळते. पाणी म्हणजे हेच आमचे जीवन झाले आहे. दिवस रात्र तोच विचार मनात असतो. आमच्याकडे टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे ग्रामस्थ सांगतात.

सततच्या या दुष्काळाने स्थानिक अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे. कामंच मिळत नसल्याने स्थलांतरणाचाही विचार येथील तरुणांच्या डोक्यात घोंगावतोय. अनेक तरुण मालेगाव येथे दोनशे ते अडीचशे रुपये रोजाने मजुरी व सेंट्रींगचे काम करून पोटाची खळगी भरत आहे. या भागात पाऊस झाला तरी कमी होतो. तसेच पाण्याचे कोणतेही सूक्ष्म नियोजन नसल्याने आहे ते पाणी जिरून जाते वा वाया जाते. तसेच येथील छोटे मोठे ओढे, नाले, बंधारे, तलाव, धरणे व जलाशये कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यातून दुष्काळाचा दाह स्थानिकांना सोसवेना झाला आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट असतांना आता गुराढोरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्‍न आ वासून उभा आहे.

अंगदुखी अन् कंबरदुखीचा त्रास

महिला वर्गाला पाणी भरण्यासाठी सतत धावपळ करावी लागते. अनेक वर्षांपासून ही कसरत करावी लागत असल्याने महिलांना कंबरदुखी, अंगदुखी त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कोणाला सांगायचा असा उद्विग्न प्रश्‍न महिलांनी यावेळी उपस्थित केला. स्वत:कडे दुर्लक्ष करून त्यांचा पाणी भरणे कार्यक्रम सुरूच आहे.

३०० फुटांपर्यंत बोअरला पाणी नाही

या भागात जमिनीतील पाणी संपले आहे. गिरणा नदी असून तिच्या पाण्याचा उपयोग नदी काठच्या गावांना होतो. मात्र ज्वार्डी येथे अनेक ३०० फुटांपर्यंत बोअर घेतले, तरी देखील पाणी लागत नाही. गावातील छोटे मोठे बांधकाम करण्यासाठी खड्डा खोदून त्यात पाणी आणून टाकले जाते व नंतर या पाण्याचा उपयोग केला जातो.

सेंट्रींग काम करून उदरनिर्वाह

गावातील मुले मालेगाव येथील एमजी मार्केट येथे सेंट्रींग काम व रोजंदारी करतात. त्यांना अवघे दोनशे ते अडीचशे रुपये रोज मिळतो. मात्र येथे मिळणारा रोज घरातील भाजीपाला व किराणा यातच खर्च होतो. उरलेले पैसे कामावर जाण्यासाठी गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जातात. त्यातून शिल्लक काही राहत नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!