पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचे आवाहन

0
मालेगाव | प्रतिनिधी आगामी गणेशोत्सव व मोहरम सण पारंपारिक पद्धतीने ध्वनिप्रदूषण टाळत उत्साहात व शांततेत साजरे करत सर्वधर्मीय एकतेचा नावलौकिक कायम ठेवावा. शांततेस गालबोट लागणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन करत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन यंत्रणेने सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
येत्या दोन दिवसावर येवून ठेपलेल्या गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांनी आज मालेगावी भेट देत शासकीय विश्रामगृहावर प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत उत्सव काळात पुरविण्याच्या सुविधा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीनंतर नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉल येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी गणेशोत्सव व मोहरम सण पारंपारीक पध्दतीने उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले.
जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अ.पो. अधीक्षक नीलोत्पल, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, प्रांत अजय मोरे, पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, शशिकांत शिंदे, तहसिलदार ज्योती देवरे आदी अधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.
यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांनी पर्यावरणपुरक पध्दतीने साजरा करावा. कर्णकर्कश वाद्य वाजवत ध्वनिप्रदूषण करू नये, असे आवाहन करत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, खड्डामुक्त मिरवणूक व अतिक्रमणमुक्त शहर रहावे या दृष्टिकोनातून कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
उत्सव आनंदाने साजरा व्हावा या दृष्टीकोनातून सुविधा पुरविण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. सार्वजनिक मंडळांनी देखील उत्सव शांततेत पार पडण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
गणेशोत्सव काळात कुणाच्या भावना दुखविल्या जाणार नाही याची दक्षता सार्वजनिक मंडळांनी घ्यावी. तसेच परवानगीसाठी पोलीस यंत्रणेने सुरू केलेल्या एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांनी यावेळी बोलतांना करत परवानगी न घेणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
यावेळी उत्सव समिती अध्यक्ष सुनील चांगरे, मयुर माळी, जगदीश गोर्‍हे, गुलाब पहेलवान, इफ्तेखार पहेलवान यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या.बैठकीस रामदास बोरसे, केवळ हिरे, प्रमोद शुक्ला, हरिप्रसाद गुप्ता, दीपक पाटील, अनिल भुसे, यशपाल बागुल, दीपक सावळे, अभिजीत भावसार, राजेश गंगावणे, शहादत पठाण, गुलाब पहेलवान, बशीर शेख, दिनेश पाटील, अर्जुन भाटी, जगदीश भुसे आदींसह मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्रामगृहावर आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करतांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गणेशोत्सव-मोहरम सणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या सणांच्या पार्श्‍वभूमीवर रस्ते, अखंडीत वीजपुरवठा, गणेशकुंड स्वच्छता, विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढणे, स्वच्छता आदी सुविधा त्वरीत पुर्ण करण्यासंदर्भात संबंधित विभागप्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत.
कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून गुन्हेगार तसेच समाजकंटकांविरूध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सण-उत्सव जनतेत आनंदाने साजरे करता यावे यासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे, असे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
शांततेसाठी आघार येथे बैठक
तालुक्यातील आघार बु. येथे दोन गटात झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटकसत्र सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आघार येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांची विश्रामगृहावर भेट घेत गावातील परिस्थितीबाबत माहिती देत तरूणांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती केली.
गावात जातीय सलोखा व शांततेच्या दृष्टीकोनातून प्रांत, तहसिलदार व गटविकास अधिकार्‍यांनी सर्व समाजबांधवांची बैठक घेत शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचना संबंधित अधिकार्‍यांना करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी देखील शांततेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी शिष्टमंडळास केले.

LEAVE A REPLY

*