Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

सोयगाव नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण; गोरगरीब रूग्णांवर चांगले उपचार व्हावेत : राज्यमंत्री भुसे

Share

मालेगाव । प्रतिनिधी

सोयगाव भागातील जनतेस विशेषत: गोरगरीब रूग्णांच्या सोयीसाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली असून उपचाराच्या आवश्यक सुविधा या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांनी चांगली सेवा देत या केंद्राचा हेतू सफल करावा, अशी अपेक्षा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना केली.

महानगरपालिकेतर्फे सोयगाव येथे ६० लाखाच्या निधीतून प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. या केंद्राचे लोकार्पण आज राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते केले गेले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. महापौर शेख रशीद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, सेना गटनेते निलेश आहेर, माजी स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, नगरसेविका आशा प्रकाश अहिरे, जिजाताई बच्छाव, डॉ. शरद बच्छाव आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

गोरगरीब रूग्णांना चांगले उपचार मिळावेत या दृष्टीकोनातून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत सामान्य रूग्णालयात डायलेसीस, सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी आदी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे तर सटाणारोड येथे महिला-बाल रूग्णालय कार्यान्वित करण्यात आले. यामुळे गोरगरीब रूग्णांची मोठी आर्थिक गैरसोय दूर झाली असल्याचे स्पष्ट करत राज्यमंत्री भुसे पुढे म्हणाले, सोयगाव नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्मितीमुळे किरकोळ आजारांनी बाधीत रूग्णांवर तातडीने उपचार होवू शकणार असल्याने परिसरातील जनतेची मोठी गैरसोय दूर झाली आहे. गोरगरीब जनतेस चांगले उपचार मिळावेत या दृष्टीकोनातूनच नगरसेवकांनी पाठपुरावा करत या रूग्णालयाची निर्मिती केली आहे. त्यामुळे वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांनी चांगली सेवा देत आरोग्य केंद्र निर्मितीचा उद्देश सफल करावा, असे आवाहन भुसे यांनी शेवटी बोलतांना केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव यांनी केले.

कार्यक्रमास मनपा आरोग्य अधिकारी सायका शेख, शहर अभियंता कैलास बच्छाव, नगरसचिव राजेश धसे, माजी गटनेते मनोहर बापू बच्छाव, धर्माअण्णा भामरे, नंदू सावंत, वैद्यकिय अधिकारी डॉ. ठाकरे, प्रकाशआबा अहिरे, दिलीप बच्छाव, डॉ. शरद बच्छाव, डॉ. जतीन कापडणीस आदींसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. आभार डॉ. भिमराव त्रिभुवन यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!