Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमहावितरणचे आवाहन : नोकरीचे प्रलोभन दाखवून आर्थिक मागणी करणार्‍यांपासून सावध रहा

महावितरणचे आवाहन : नोकरीचे प्रलोभन दाखवून आर्थिक मागणी करणार्‍यांपासून सावध रहा

नाशिकरोड । प्रतिनिधी

महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून निवड पत्र पाठविण्याचे प्रलोभन दाखवित पैसे उकळणार्‍या व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

सोलापूर परिसरातील काही जणांना मोबाईलद्वारे संपर्क साधून असे प्रलोभन दिले जात असल्याचे आढळून आले आहे. महावितरणमध्ये अस्तित्वात नसलेल्या पदांसाठीही निवड करण्याचे प्रलोभन दाखवून फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई येथून संपर्क करीत असल्याचे उमेदवारांना सांगितले जाते आणि निवड पत्र पाठविण्याचे प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रयत्न होत आहेत.

काही पदे महावितरणमध्ये अस्तित्वात नाहीत, अशाही पदांसाठी निवडपत्राचे प्रलोभन दाखविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र महावितरणकडून संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान तसेच निवड पत्र किंवा रूजू होण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणमध्ये नोकर भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होत आहे. या भरतीच्या प्रत्येक टप्प्याची माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय नोकर भरतीची जाहिरात, पदसंख्या, आरक्षित पदे, लेखी परीक्षेचा संभाव्य दिनांक, लेखी परीक्षेसाठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी, परीक्षेत उत्तीर्ण व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीची तारीख तसेच निवड झालेल्या उमेदवारांची यादी आदींची सर्व माहिती संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाते.

यासोबतच संबंधित उमेदवारांना नोंदणी केलेल्या त्यांच्या ई-मेलवर व मोबाईलवरही भरती प्रक्रियेबाबतची माहिती दिली जाते. निवड झालेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते व संबंधीत उमेदवारांना इमेलद्वारे व लेखी पत्राद्वारे कळविले जाते. महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रलोभनासाठी आर्थिक मागणी करणार्‍या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या