Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

Share
६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; Maharashtra Kesari wrestling tournament prepration in final stage

पुणे | प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकासक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या पदकांचे अनावरण आज परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे करण्यात आले. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पहिलवान, पंच, प्रशिक्षकांच्या वर्दळीने क्रीडा संकुलात नवचैतन्य संचारले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन उद्या शुक्रवारी (दि. ३ )सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, संग्राम थोपटे, सुनील शेळके, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, सहसंचालक जयप्रकाश दुबळे, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवडीचे उपसंचालक आनंद व्यन्केश्वर, क्रीडा व युवक सेवा मुख्यालयाचे उपसंचालक सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आदि उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनाच्या पूर्व संध्येला परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे, प्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे यांनी आखडे व तयारीची पाहणी केली.

शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्ती या खेळाची भव्यता आणि लोकप्रियतेची प्रचिती स्पर्धेसाठी सज्ज झालेले आखाडे बघून येते. मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज झाले आहेत. येथे मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची ४० ब्रास माती आणून २०-२० ब्रासचे दोन आखडे तयार करण्यात आले आहेत. या मातीत १००० लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज १०० लीटर ताक आणि ६० लीटर तेल घालून मातीचे आखडे तयार झाले आहेत. पहिलवानांना स्पर्शांतून, जखमातून कोणत्याही प्रकारचे आजार किंवा लागण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असते. ४० बाय ४० चे रिंगण व ३० बाय ३० चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशा प्रकारे हे चारही आखडे तयार आहेत. आखड्यांचा हा मुख्य मंच ६० बाय २१० फुटांचा असून त्या बाहेर १० फुटाचा भाग पंचांसाठी व त्या बाहेर १० फुट भाग पहिलवानांच्या तयारीसाठी सज्ज करण्यात आहे.

सकाळ पासून राज्यातील ४४ जिल्ह्यांमधून पहिलवनांचे आगमन सुरू झाले असून तब्बल ९०० ते ९५० कुस्तीगीर व १२५ पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे दाखल झालेत. दिवसभरात पंचांचे दोन उजळणी सत्र झाले. उद्या सहभागी होणार्‍या ‘अ’ विभाग (५७ व ७९ किलो)गटातील तब्बल २०० पहिलवानांची आज वैद्यकीय तपासणी व वजने करण्यात आली.

पदकांविषयी 
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला साजेसे असे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके या स्पर्धेसाठी बनविण्यात आली आहेत. ऑलिंपिक स्पर्धांतील पदकांच्या दर्जाची या पदकांची डिझाईन असून यांचे वजन प्रत्येकी ४५० ग्राम आहे. प्रत्येकी व्यास ९० सेमी आहे. वरच्या भागत अमनोरा लिहिलेले असून वर्तुळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा लोगो टाकण्यात आला आहे. रोज होणार्‍या स्पर्धांच्या शेवटी रोज पदक वितरण समारंभ होणार असून एकूण २० सुवर्ण, २० रौप्य व गादी विभागासाठी ४० तर मातीसाठी ३० कांस्य पदके तयार करण्यात आली आहेत.

यावेळी प्रवीण तरडे यांनी भेट दिली. ते म्हणाले, “स्वतः रुस्तूम-ए-हिंद अमोल बुचडे यात लक्ष घालत असल्याने तयारी योग्य होणारच. मी देखील एकेकाळी कुस्ती खेळत होतो. आज सिनेमा क्षेत्रात असलो तरी कुस्ती आणि मातीशी नाळ तुटलेली नाही, म्हणूनच येथे आल्या वाचून राहवले नाही. कुस्ती आपली आहे. त्यामुळे येथे निमंत्रणची वाट न बघता घरचे लग्न असल्यासारखे स्वतःहून याला हवे.”

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!