मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणकडून साडेपाच कोटी रूपये जमा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणकडून साडेपाच कोटी रूपये जमा

मुंबई । प्रतिनिधी

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने चांगला प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणने सुमारे साडेपाच कोटी रूपये जमा केले आहेत. ‘कोरोना’ विरोधी लढ्यामध्ये केलेल्या आर्थिक योगदानाबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणचे कौतुक केले आहे.

कोरोना संकट निवारणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये देऊन महापारेषणने प्रतिसाद दिला होता.

आता महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ९३ लाख ३५ हजार ७६२ रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. तसेच महापारेषणच्या सांघिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) फंडातून तब्बल दोन कोटी रूपये राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लढाईसाठी महापारेषणने एकूण सुमारे साडेपाच कोटी रूपये दिले आहेत.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वाघमारे म्हणाले, ‘कोरोना’ विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महापारेषणकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही महापारेषणच्या कामाचे जाहीर कौतुक केले आहे. वीजपुरवठा अखंडित व चांगल्या क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com