राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धा : कुणाल शिंदेची महाराष्ट्र संघात निवड
Share

नाशिक | प्रतिनिधी
भारतीय शालेय खेळ महासंघ व भारतीय खेळ प्राधिकरणद्वारे ६५ वी राष्ट्रीय शालेय १९ वर्षांआतील बेसबॉल स्पर्धा १८ ते २३ नोव्हेंबरला पंजाबमधील चंदीगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉ. एम. एस. गोसावी ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचा कुणाल अनिल शिंदे यांची महाराष्ट्राच्या शालेय संघात निवड झाली आहे.
तत्पूर्वी, राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांआतील बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांतील १६८ खेळाडूंमधून मुलांचा महाराष्ट्राचा बेसबॉल संघ निवडण्यात आला. या १६ जणांच्या महाराष्ट्राच्या शालेय संघामध्ये नाशिक विभागातील कुणाल शिंदे यांची निवड झाली.
कुणाल हा महाविद्यालयाचा पहिला राष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. त्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व मेहनतीच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. त्याचा एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. अशोक डी. पवार, क्रीडा मार्गदर्शक सुरेश कोकाटे उपस्थित होते.