Monday, April 29, 2024
Homeनाशिकखेरवाडी रेल्वे फाटक कायमस्वरुपी होणार बंद

खेरवाडी रेल्वे फाटक कायमस्वरुपी होणार बंद

खेरवाडी। वार्ताहर

उड्डाणपुलाचे काम होणार सुरू,
तात्पुरता रस्ता मोरीखालून,
शेतमाल वाहतुकीला अडचणी,
जवळचा पर्यायी रस्ता देण्याची मागणी,

- Advertisement -

खेरवाडी येथे रेल्वे क्रॉसिंगजवळील रेल्वे गेट बंद करून त्याऐवजी या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार असल्याने या रस्त्याच्या कडेच्या टपर्‍या काढण्याचे निर्देश रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाने दिले असून फाटक बंदमुळे बससेवा बंद होऊन शालेय विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तसेच शेतमाल वाहतुकीसाठी देखील शेतकर्‍यांना अडचणीचे होणार आहे. रस्त्याच्या कडेची दुकाने उठवली जाणार असल्याने या व्यावसायिकांनी पर्यायी जागेची मागणी केली असून रस्ता बंदमुळे येथील उद्योगधंदे कोलमडून पडणार आहे.

ओझर ते शिर्डी महामार्गावर रहदारीत वाढ झाल्याने या मार्गावर असलेले खेरवाडी रेल्वे गेट बंद करुन त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्याबाबत रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांनी नुकतीच खेरवाडी येथे जावून ग्रामसभा घेत ग्रामस्थांशी चर्चा केली. खेरवाडी येथील रेल्वे गेट क्रं. ९४ चे फाटक हे वाहतुकीच्या कोंडीचे कारण ठरत असल्याने बंद ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे महारेलचे अभियंता स्वानंद राऊत यांनी सांगितले.

याप्रसंगी खेरवाडी ग्रामस्थ, व्यावसायिक, माथाडी कामगार उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी सुभाष गवई यांनी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांची ओळख करुन देत या अधिकार्‍यांनी ग्रामस्थ व व्यावसायिकांशी संवाद साधला. येथील रेल्वे गेट बंद मुळे छोटी वाहने व मोटारसायकलसाठी जवळच्या रेल्वे मोरीखालून पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. साहजिकच या मार्गावर धावणार्‍या बसगाड्या बंद होवून शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शेतकर्‍यांना शेतमाल वाहतुक करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येथील बी.जी. पाटील, शंकर संगमनेरे, सोमनाथ संगमनेरे, अनिल आवारे व माथाडी कामगारांनी स्थानिकांना येणार्‍या अडचणी कथन केल्या. तर रस्त्याच्या कडेच्या टपर्‍या या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असल्याने त्यांनाही या विभागाने यापुर्वीच नोटीदा देत टपर्‍या काढण्याची मागणी केली आहे.

मात्र, आता या व्यावसायिकांना पर्यायी जागा हवी आहे. या उड्डाणपुलाचे काम साधारणपणे ८ ते १२ महिने चालणार असून उड्डाणपुलामुळे येथील छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांवर परिणाम होणार आहे. मात्र उड्डाणपूल झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास सुखकर व जलद होणार असल्याचे मत देखील अनेकांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत शालेय विद्यार्थ्यांचा परिक्षेचा कालावधी सुरु होत असून बस सेवा बंद होत असल्याने त्यांना चांदोरी, सायखेडा येथे शाळेत जाण्यासाठी नानाविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच याच परिसरातून भाजीपाला व शेतमाल नाशिकच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो. त्यामुळे आता या शेतकर्‍यांना चितेगाव, चांदोरी मार्गे जावे लागणार आहे. तर चांदोरी, सायखेडा, खेरवाडी येथील शेतकर्‍यांना ओझरला जाण्यासाठी सुकेणे मार्गे जावे लागणार आहे.

व्यवसायावर होणार परिणाम
उड्डाणपुलाच्या कामामुळे आमची दुकाने उठविली जात असल्याने व गावात दुसरीकडे धंद्यायोग्य जागा नाही. आमच्या दुकानाच्या मागे जि.प. शाळेच्या जागेत आम्हाला भाडेतत्वावर जागा द्यावी अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. तसेच उड्डाणपूल झाल्यावर बाहेरील वाहने पुलावरून जातील. त्यामुळे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे.
शंकर संगमनेरे, व्यावसायिक

ग्रामस्थांनी सहकार्य करावे
वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी व ग्रामस्थांच्या सोयीनेच येथे उड्डाणपूल होत आहे. काम सुरु करतांना रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांनी आपली दुकाने लवकर काढुन घ्यावी. उड्डाणपुलाचे काम गुणवत्तेबरोबरच वेळेत पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे.
स्वानंद राऊत, महारेल अभियंता

- Advertisment -

ताज्या बातम्या