Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी : वीजबिल व घरपट्टी माफ करण्यासाठी निवेदन

इगतपुरी : वीजबिल व घरपट्टी माफ करण्यासाठी निवेदन

घोटी । प्रतिनिधी

करोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे महाराष्ट्रातही या महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे सर्व रोजगार, व्यवसाय नेस्तनाबूत झाले आहे. रोजच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे राज्य शासनाने सर्वसामान्य हिताची बाब लक्षात घेऊन राज्यात सर्वसामान्य कुटुंबांचे व लहानसहान दुकानदारांचे, दैनंदिन रोजगार असणाऱ्या लहान व्यावसायिकांचे व बारा बलुतेदार यांना किमान सहा महिन्यांचे वीजबिल माफ करावे अशी मागणी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

करोना या महामारीमुळे जगाची, देशाची,राज्याचीच नव्हे तर घराघरातली अर्थव्यवस्था कोलमडून पडली, ग्रामीण भागात रोजगार बंद आहेत, उत्पन्नाची साधने लॉक डाऊन झाली, एका बाजूला करोना विषाणूचे टांगते तोरण तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागात तर भयानक चित्र निर्माण झाले, बाजाराची अवस्था तर उत्पन्नात घट आणि महागाईत भरमसाठ वाढ अशी स्थिती निर्माण झाल्याने सामान्य नागरिक, आदिवासी बांधव आज स्थितीत हतबल झाला आहे.

त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात उष्णता वाढली आहे त्यामुळे घराघरात फॅन चालू आहेत त्यामुळे विजवापर मोठया प्रमानात वाढला आहे. गेल्या तीन महिन्यापासून घराघरात रोजगार बंद झालेत, किरकोळ दुकानेही बंद आहेत, रोजगाराची साधनेही ठप्प आहे त्यामुळे सामान्य कुटुंबाला घरातला उदरनिर्वाह करणेकठीण झाले आहे. त्यात आता विजबिलाचा मोठा भार राहणार आहे.

सर्वसामान्य कुटुंबाला , इगतपुरी सारख्या आदिवासी ग्रामीण तालुक्यातील जनतेला यापूर्वीच्या तीन महिन्याचे व आगामी तीन महिन्याचे वीजबिल शासनाने माफ करावे, ग्रामपंचायत, नगरपालिका विभागाने वर्षभराची घरपट्टी माफ करून सामान्य कुटुंबाला दिलासा द्यावा वरील मागणीचा स्थानिक प्रशासन व शासनाने विचार करावा व तात्काळ निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले आहे.

शिष्टमंडळाने तहसिलदार यांच्यासमवेत चर्चा करून परिस्थितीची जाणीव करून दिली.ही मागणी आपण शासनापर्यंत पोहचवू अशी ग्वाही तहसीलदार यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी शिष्टमंडळात भाजपाचे पदाधिकारी महेश श्रीश्रीमाळ, राजेंद्र कटकाळे, गोठू कुमठ, सागर हंडोरे,सईद रंगरेज, जगन भगत, संजय जाधव, कैलास भोर, केतन विसपुते आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या