एच.आय.व्ही ग्रस्त जोडप्यांच्या जुळल्या रेशीम गाठी

एच.आय.व्ही ग्रस्त जोडप्यांच्या जुळल्या रेशीम गाठी

नाशिक । प्रतिनिधी

एचआयव्ही बाधितांच्या राज्यस्तरीय मंगल मैत्री मेळाव्यात ७ जोडप्यांच्या लग्नाच्या रेशीमगाठी जुळल्या. मेळाव्यात नाशिकसह इतर जिल्ह्यातील ४५० वधू-वर, पालक व पालकांनी सहभाग नोंदविला. महिंद्रा आणि महिंद्रा लि, यश फांउडेशन, नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल आणि चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एच.आय.व्ही , विहान प्रकल्प मालेगाव आणि जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथक, नाशिक यांच्या सयुंक्त विद्यमानाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी (दि.९) रोटरी क्लब सभागृहात मेळावा पार पडला. एच.आय.व्ही ग्रस्तांना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दुष्टीकोन निर्माण करून सुखी, समृध्द व आनंदी जगता यावे, या उद्देशाने ११ वर्षपासून सदर मंगल मैत्री मेळावा घेण्यात येत आहे. मेळाव्यामार्फत ३७ जोडप्यांचे विवाह जुळविण्यात आले आहेत.

उदघाटनप्रसंगी व्यासपीठावर महिंद्रा आणि महिंद्राचे अधिकारी कर्नल चंद्रा ब‍‍ॅ‍ॅनर्जी, कमलाकर घोंगडे, सुचेता कुलकर्णी, जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी, संगीता पवार, यश फांउडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.

इतक्या मोठ्या संख्येने विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील वर-वधूंनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल कर्नल सी.एन. बॅनर्जी आभार मानले. गत वर्षी विवाह झालेल्यांना एचआयव्ही निगेटीव्ह बाळ झाले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मेळाव्यात एच.आय.व्ही सहजीवन जगणार्या व्यक्तीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com