Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : ग्राऊंड रिपोर्ट : भाऊबीजेला ओवाळण्यासाठी घरी जाऊ शकलो नाही…

Share

नाशिक । दिनेश सोनवणे

सध्याच्या वातावरणापासून द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी अतोनात प्रयत्न करीत  आहेत . चोवीस तास शेतकर्‍याचा राबता सध्या शेतात आहे. नुकतीच दिवाळी पार पडली, आमच्या भागात दिवाळी होती का नव्हतीच जणू!

आमचा दिवाळीदरम्यानचा पूर्णवेळ द्राक्षबागेतच गेला. आमची बहीण अनेक महिन्यांनी घरी आली होती, मात्र तिच्याकडे ओवाळण्यासाठी जायलादेखील वेळ मिळाला नाही अशी खंत किरण उफाडे या तरुण शेतकर्‍याने बोलून दाखवली.

वातावरण बदलले की, शेतकरी पावडर मारण्यासाठी शेतात असतात. पावसाच्या थेंबांमुळे खराब होणार्‍या द्राक्षांच्या मणींवरील पाणी झटकण्याची त्यांची लगबग सुरू होते. सकाळी द्राक्षावर पडलेले दवबिंदूदेखील प्रत्येक झाड हलवून जमिनीवर पाडावे लागतात.

जिथंपर्यंत जाईल तिथंपर्यंत पावडर मारण्यासाठी हजारो रुपयांची डिझेल खर्ची पाडून पावडर मारावी लागते. जिथे ट्रॅक्टर पोहोचू शकत नाही, किंवा बागेत पाणी साचले असल्यास हातात स्प्रे घेऊन बागेच्या आर्‍यांमधून जावे लागते.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. वर्षानुवर्षे दुष्काळ सहन करणार्‍या जिल्ह्याला यंदा अतिवृष्टीचा सामना करावा लागल्याने ओल्या दुष्काळाची दाहकता याठिकाणी जाणवत आहे.

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा, भोपेगाव, आंबेवणी या परिसरात अजूनही गुडघ्याइतके पाणी शेतात साचले आहे. कुठे ट्रॅक्टर फसतो, तर कुठे पावडर मारताना शेतकर्‍यांचे आरोग्य बिघडते आहे. द्राक्षांचे मनी वाचविण्यासाठी सर्वोतपररी प्रयत्न येथील शेतकरी करत आहे.

दोन वर्षांपूर्वी द्राक्षबागांचे आतोनात नुकसान झाले होते, त्यामानाने गेल्या वर्षी थोडीशी परिस्थिती बरी होती. दोन पैसे पदरात पडले. हातीपदरी होत्या-नव्हत्या पैशांचा जुगाड लावून, प्रसंगी कर्ज काढून द्राक्षबागा वाचविण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना नजरेस पडत आहेत.

द्राक्षाची साथ चांगली पण निसर्गापुढे सगळे शून्य
द्राक्षाची पौंगंडावस्था व मणी तयार होण्याच्या स्थिती, या काळात जर चांगल्या वातावरणाने साथ दिली, तर द्राक्ष अगदी नियोजनबद्घ एक्सपोर्ट क्वालिटीचा माल याठिकाणी शेतकरी काढतो. सध्या जे मणी झाडावर शिल्लक आहेत त्यांचीच काळजी घेऊन निदान पावडरीचा खर्च, ट्रॅक्टरला लागलेल्या डिझेलचा खर्च काढण्याचा प्रयत्न आहे. बाकी भांडवलासाठी घरघर पुढील वर्षी होणार यात शंका नाही.

आजार जडले
वातावरणावर मात करण्यासाठी नाजूक पीक समजल्या जाणार्‍या द्राक्षावर दिवसांतून तीन-तीन स्प्रे मारावे लागतात. विषारी ते अतिविषारी किटकनाशकांचा वापर करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. पीक वाचविण्याच्या प्रयत्नांत शेतकरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे अनेक आजारांचा सामोरे जावे लागते. श्‍वसनाचा त्रास आणि त्वचेचे आजार अधिक होतात.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!