Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ग्राउंड रिपोर्ट : अहो साहेब, खर्चही निघेनासा झाला हो!

Share

नाशिक । दिनेश सोनवणे

कांद्याचे रोप लावल्यापासून निसर्गाने साथ सोडली हो…चार एकर कांदा लावायचा होता तिथे एकरभरच लागला. निदान एकमधून दोन पैसे मिळतील असे वाटले होते. पण, ऐन काढणीच्या प्रसंगाला परतीच्या पावसाने कांदे भिजवले. शेतातील एक-एक कांदा जमवून आम्ही आज बाजारात आणला आहे. आज मोठाही भाव असेल तरीही शेतकर्‍यांच्या पदरात खडकूही पडत नाहीये…या व्यथा आहेत लासलगाव बाजार समितीत कांद्याची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांच्या.

किरकोळ बाजारात कांद्याचे बाजारभाव गगणाला भिडलेत. बाजारसमितीत शेतकर्‍यांची चांदी झाली असे सर्वांनाच वाटते आहे. मात्र, असे काहीही नाही. शेतकर्‍यांना जो आज पैसा मिळतोय, तो केवळ त्यांचा खर्च आहे. जेव्हा परतीच्या पावसाचे या पिकावर सावट होते तेव्हा याच शेतकर्‍यांना हा कांदा वाचविण्यासाठी दिवसातून दोन-दोन फवारणी केलीये. एकरी एका फवारणीचा खर्च दोन ते अडीच हजार रुपये यायचा. शेतकर्‍यांना दोन पैसे मिळतील, अशी आशा असते. त्यामुळे बदललेल्या वातावरणापासून आपले पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी जीवाचे रान केले. तळहाताच्या फोडाप्रमाणे पीक जगवले; पण अखेरीच नशीबच. परतीच्या पावसाने दगा दिला. होते नव्हते पीक हिरावून नेले. जे उरले होते ते बाजारात आणले आहे. त्यात एवढ्याशा पिकाला कुठेतरी भाव मिळतो आहे तर त्यातही सगळीकडे चर्चांच चर्चा होत आहेत.

एकदा शेतकर्‍यांच्या शेतात येऊन पाहा…परिस्थिती पाहिली तर तुम्हालाही रडू कोसळल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया येवला तालुक्यातील अंगुलगावच्या शेतकर्‍याने ‘देशदूत’शी बोलताना दिली. हा शेतकरी एवढ्यावरच थांबला नाही, तो म्हणाला मी आज दहा क्विंटल कांदा विक्रीला आणला आहे. माझ गाव 35-40 किलोमीटरवर आहे. पण यंदाचा बाजारभाव वाढल्यामुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. दहा क्विंटल कांदा लासलगाव बाजारसमितीत विक्रीसाठी आणण्यासाठी मला दोन हजार रुपये वाहतूक खर्च द्यावा लागणार आहे. आमचा होत असलेला खर्चही बघा. याचाही विचार करा, आम्हीही माणसेच आहोत ना.

कांदा भाव वाढला की, सर्वांसाठीच महागाई किती झाली असा कॉमन प्रश्न उपस्थित राहतो. अशावेळी मोठमोठ्या सिनेमागृहात अडीचशे-तीनशेचे एका शोचे तिकीट काढल्यानंतर सोबत ७० ते १०० रुपयांचे पॉपकॉर्नपण तुम्ही नेता, अशावेळी तुम्हाला महागाई दिसत नाही का? मग झाले एखाद्या वर्षी कांदे शंभर रुपये किलो तर काय बिघडले. महिन्याला अवघे एका कुटुंबाला तीन-चार किलो तर कांदे लागतात. कांदे पिकवणारे, शेती कसणारे तुमचे पूर्वजही शेतकरीच होते ना…जरा त्यांचाही विचार करा. मिळू द्या दोन पैसे त्यालाही. अशा भाषेत एका शेतकर्‍याने तर जिवाच्या आकांताने फटकारलेच.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!