किराणा दुकानातील कामगार निघाला चोर, अडीच लाखांची रक्कम हस्तगत

पंचवटी | वार्ताहर

किराणा दुकानातील कामगारानेच दुकानातील सुमारे २ लाख ५० हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना झाली होती. दरम्यान पंचवटी पोलिसांनी मोठया शिताफीने संशयित कामगारास जेरबंद करीत चोरीला गेलेली संपूर्ण रोख रक्कम हस्तगत केली आहे.

या प्रकरणी संशयित राहुल संजय तुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तक्रारदार दर्शन नरेश लुनावत (वय.३४, रा.दत्तनगर, पेठरोड, पंचवटी) यांचे येथील दत्तमंदिरासमोर किराणा दुकान असून (दि.२०) फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटवून दुकानाच्या गल्यातील सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे तपास करीत असतांना त्यांनी तक्रारदार दर्शन लुनावत यांच्याकडून चांगली माहिती समजावून घेतली असता त्यांच्या दुकानात कामास असलेला मूलगा राहुल संजय तुरे हा कामावर आला नसल्याची माहिती मिळाली.

यामुळे राहुल तुरे याच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने त्याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित करून तो राहत असलेल्या शेषराव महाराज चौक, फुलेनगर येथील घरी पोलीस गेले. मात्र त्याला पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच संजय तुरे याच्या मुसक्या आवळत त्याला पोलीसी खाक्या दाखविताच चोरीची कबुली देत २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम पोलिसांना काढून दिली.

पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, हवालदार विकास देशमुख, पोलीस नाईक शेषराव केदारे, दशरथ निंबाळकर, सचिन म्हसदे, श्रीकांत कर्पे यांनी कामगिरी केली.