Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकद्राक्ष निर्यात परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद

द्राक्ष निर्यात परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद

नवीन नाशिक । प्रतिनिधी

बदलत्या द्राक्षशेती संदर्भात नवीन व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्याचा वेध घेण्यासाठी महा एफपीओ फेडरेशन आणि को गो पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष निर्यात परिषदेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विभागाचे माजी आयुक्त पांडुरंग वाठारकर उपस्थित होते. यावेळी राज्यातील 80 निर्यातदार व शेतकरी उत्पादक कपन्यांनी सहभाग घेतला.

- Advertisement -

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला को गो पोर्ट कंपनीचे संस्थापक कुणाल राठोड यांनी सांगितले की, को गो पोर्ट ही संस्था निर्यातदारांना व शेतकर्‍यांना निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देते. त्यासोबतच त्यांच्याकरिता आधुनिक तंत्रज्ञान व ट्रेड फायनान्स तसेच पतपुरवठा देखील करते.अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना वाठारकर यांनी को गो पोर्ट सामान्य शेतकर्‍यांकरिता कार्य करत असल्याबद्द को गो पोर्ट व महा एफ पीओ फेडरेशनचे कौतुक केले. शेतकर्‍यांना उपलब्ध झालेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

भारतीय द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी मार्गदर्शन करताना इतर प्रमुख द्राक्ष उत्पादक देशांमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी पाठबळ देण्याचे धोरण राबविले जात आहे. मात्र आपल्याकडे त्यात उणिवा आहेत. म्हणून शासनाने द्राक्ष निर्यातीला चालना देण्याकरिता धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. द्राक्ष निर्यातीत सातत्य टिकविण्यासाठी व वाढ होण्यासाठी नवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा असे आवाहन केले.

कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव म्हणाले की बाहेर देशात द्राक्ष पाठवितांना गुणवत्तापूर्ण मालाला प्राधान्य दिले जाते. द्राक्ष निर्यात वाढून द्राक्ष उत्पादकांना दोन पैसे मिळावा हा कृषी विभागाचा हा प्रयत्न आहे. मात्र निकष पाळून निर्यात व्हावी यासाठी निर्धाराने देखील कृषी विभागात सहाय्यक केले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.

द्राक्ष बागायतदार संघ कोषाध्यक्ष कैलास भोसले म्हणाले की, द्राक्ष निर्यातीचे निकष न पाळल्याने रशियामधील निर्यात करताना अडचणी निर्माण झाल्या व त्यात उत्पादकांचे पैसे अडकले म्हणून येत्या काळात निर्यातीच्या निकषानुसार निर्यात झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कृषी सल्लागार प्रमोद देशमुख यांनी शासकीय स्तरावर शेतकर्‍यांना केंद्रबिंदू धरून त्यांना तंत्रज्ञानासह मदत केली तरच निर्यात वाढू शकते असे सूचक वक्तव्य केले. या कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक गोकुळ वाघ, प्रकल्प उप संचालक हेमंत काळे, नाशिक रीजनल हेड महा एफपीओ फेडरेशन भूषण निकम, कुणाल राठोड, कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामनाथ जगताप, महेंद्र इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या