मार्चअखेर शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा : निमसे

मार्चअखेर शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा : निमसे

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून नाशिक महापालिका शहर बससेवेच्या सीएनजीवरील बसेस आणि शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्यासंदर्भातील काम सुरू झाले आहे. या कंपनीला लागणार्‍या परवानग्या व जागेसंदर्भात तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश आपण दिले असून मार्चअखेरपर्यंत शहराच्या काही भागात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा होणार असून १ एप्रिलपासून शहर बससेवेतील सीएनजी बसेस चांगल्या क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती स्थायी सभापती उद्धव निमसे यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीमार्फत सुरू झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी आणि स्थायी समिती सभापती निमसे यांच्यासह पदाधिकारी व गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांची काल स्थायी सभागृहात बैठक झाली. या बैठकीत महापौर व सभापतींनी नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या अधिकार्‍यांकडून प्रगतीसंदर्भात माहिती घेतली. या आढावा बैठकीत कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक रामनारायण यांनी नाशिकमधील कामांची माहिती दिली.

यात नाशिक शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठ्याकरिता ११ हजार ग्राहकांनी गॅस नोंदणी केली आहे. शहराच्या डीपीत असलेल्या ३३ कि. मी. रस्त्यातील २३ मोठे रस्ते आणि १३ लहान रस्त्यांवर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम केले जाणार आहे. तसेच जिल्ह्यात १६० ठिकाणी सीएनजी पंप कार्यरत होणार आहे. टिटवाळा ते नाशिक अशा १०३ कि.मी अंतरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून तोपर्यंत पुणे येथील टँकरने गॅसपुरवठा केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच पाईपलाईनद्वारे थेट हाऊसिंग सोसायटीत गॅस पुरवण्याकरिता स्टेशनकरिता जागांची मागणी करण्यात आली असून यास मान्यता मिळावी, अशी विनंती कंपनीकडून करण्यात आली. कंपनीकडून केल्या जाणार्‍या कामांची निविदा प्रक्रिया होऊन याकरिता निवडण्यात आलेल्या एजन्सींकडून कामास प्रारंभ झाला असून मार्चअखेरपर्यंत प्रत्यक्ष गॅसपुरवठ्याचे काम सुरू होणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

या बैठकीनंतर स्थायी सभापती निमसे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. शहरात महापालिकेच्या सीएनजी बसेसकरिता सहा ठिकाणी सीएनजी स्टेशन कार्यरत केले जाणार आहेत. यात पाथर्डी (विल्होळी), आडगाव, तपोवन (साधुग्राम), फायर ब्रिगेड स्टेशन पंचवटी, सिन्नर फाटा आणि चेहडी (नाशिकरोड) या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच शहरातील रस्त्यात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
या कामासाठी लागणार्‍या जागेसंदर्भात तत्काळ निर्णय घेणे आणि यासंदर्भातील परवानग्या तत्काळ देऊन या कामास वेग देण्याच्या सूचना आपण बैठकीत केल्या. एकूण गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांनी कामाच्या प्रगतीसंदर्भात दिलेली माहिती आणि दिलेल्या आश्वासनानुसार मार्चअखेर शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा आणि 1 एप्रिलपासून शहर बससेवेतील सीएनजी बसेस चांगल्या क्षमतेने धावतील, असेही सभापतींनी सांगितले.

बैठकीस सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, संतोष साळवे, शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, सहायक संचालक नगररचना प्रमोद भार्गवे, कार्यकारी अभियंता महेश तिवारी तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे, कार्यकारी अधिकारी रामनारायण, संदीप श्रीवास्तव, राजेश आढाव आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com