Type to search

Breaking News Featured गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

गणेशोत्सवात झगमगणार ‘स्मार्ट रोड’

Share

नाशिक । प्रतिनिधी

शांतता समितीच्या बैठकीत गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक मार्गानेच काढण्याचा आग्रह शहरातील गणेश मंडळांनी धरल्याने आज पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील व स्मार्ट सिटीच्या पदाधिकार्‍यांनी मेहेर ते अशोकस्तंभ या स्मार्ट रोडची पाहणी केली. गणेशोत्सवापर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करूच, असा विश्‍वास अधिकार्‍यांनी वक्त केला.

काल दुपारी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, स्मार्ट सिटीचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ असा संयुक्त पाहणी दौरा केला.

यावेळी आयुक्तांनी मार्गातील सुधारणांबाबत काही सूचना केल्या. तसेच काम लवकरात लवकर करून मंडळांना दिलासा देण्याचा आग्रह धरला. तर प्रकाश थविल यांनी स्मार्ट रोडचे काम करणार्‍या कंत्राटदारास काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या.

याबाबत गणेश मंडळांनी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. अशोकस्तंभ परिसरात मोठ्या प्रमाणात मंडळांचे गणपती असतात. यामुळे या परिसरात भाविकांची दहाही दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर दर्शन तसेच आरास पाहण्यासाठी याच भागातून भाविक रविवार कारंजा व इतरत्र जातात.

प्रामुख्याने अखेरच्या दिवशी निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक ही पारंपरिक मार्ग असलेल्या महात्मा गांधी रोडनंतर मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा व पुढे पंचवटीत गोदावरी नदीवर जाते. ती यंदाही याचमार्गे नेली जाणार आहे. ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

परंतु सदर मार्गातील मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ परिसरात स्मार्ट रोडचे काम सुरू असून ते अपूर्णावस्थेत आहेत. एका बाजूने वाहतूक सुरू असली तरी या बाजूने तीन ठिकाणी मोठे उंचवटे तयार करण्यात आले आहेत. यामुळे १५ ते २० फूट उंच मूर्ती घेऊन जाणारी वाहने या ठिकाणी आदळून अपघात होण्याची तसेच मूर्ती भंग होण्याची शक्यता आहे. यामुळे स्मार्ट रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार सोमवारी महापालिका, स्मार्ट सिटी, पोलीस व मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी स्मार्ट रोडची संयुक्त पाहणी केली होती. तर आज पोलीस आयुक्तांनी स्मार्ट सिटी कार्यालयात अधिकार्‍यांशी चर्चा करून दुपारी संयुक्त पाहणी केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!