Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनिर्यातबंदी हटवण्यासाठी कांदा उत्पादक घालणार शरद पवारांना साकडे

निर्यातबंदी हटवण्यासाठी कांदा उत्पादक घालणार शरद पवारांना साकडे

नाशिक । विजय गिते

गतवर्षी झालेला मुसळधार पाऊस तसेच अवेळी पावसामुळे कांदा पिकाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला.परिणामी कांदा दर मोठ्या प्रमाणात वाढले.यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंधने लादून पुन्हा शेतकर्‍यांच्या विरोधात पाऊल उचलत निर्यातबंदीची तत्परता दाखविली.आता कांद्याचे दर दिवसागणिक उतरत चालले असून आता अशीच तत्परता केंद्र सरकार दाखविणार का?असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नामध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लक्ष घालावे,अशी अपेक्षा जिल्ह्यातील कांदा उत्पादक बाळगून असून तसे साकडेही खा.पवार यांना जिल्ह्यातील कांदा उत्पादकांंकडून शुक्रवारी (दि.१७)नाशिक दौर्‍यात घालणार आहे.

- Advertisement -

अवेळी पावसामुळे कांदा पिकाच्या लागवडीवर राज्यात मोठा परिणाम झाला. परिणामी कांदा दर मोठ्या प्रमाणात वाढले. या काळात आंतरराष्ट्रीय परिस्थिती व कांद्याचे देशांतर्गत भाव पाहता कांद्याच्या निर्यात वाढण्याची लगेच शक्यता नव्हती. तरीही सरकारने कांदा निर्यातबंदीसाठी तत्परता दाखवली.या माध्यमातून स्थानिक बाजारात भाव पडण्याच्या भीतीचे वातावरण निर्माण करून शेतकर्‍यांना स्वस्तात कांदा विकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारने ही बंदी लादली.मात्र,याचा फटका आता कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे..

कांद्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कुठे चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे मागील नुकसानीतून थोडेबहुत सावरण्यास शेतकर्‍यांना मदत होऊ लागली होती. मात्र, पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले व आगामी हंगामात देशात कांद्याची टंचाई निर्माण होईल. यासाठी सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेत खबरदारी घेतल्याचे आता सांगितले जात आहे. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. राज्यातील कांदा बाजारभाव पूर्वीच्या तुलनेत आज घसरले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय ज्या तत्परतेने घेतला होता. तशीच तत्परता निर्यातबंदी हटवण्यासाठी घेऊन कांदा आयात करण्याचे थांबवावे व शेतकर्‍यांना न्याय द्यावा,अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत केंद्र शासनाने निर्णय घ्यावा, असे साकडे जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना नाशिक दौर्‍यात घातले जाणार आहे. याबाबत खा.पवार हे कांद्याबाबत काय भूमिका घेतात याकडेही कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

…तर राहतील भाव स्थिर

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता लवकरच लेट खरीप(रांगडा) कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस येणार आहे. याबरोबरच महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश,राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील स्थानिक कांदाही बाजारात दाखल झालेला आहे. दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने परदेशातून आयात केलेला कांदा महानगरांमध्ये दाखल झालेला आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कांदा उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस कांदा बाजार भाव कमी होत आहेत. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन शिल्लक कांदा निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठेत रवाना झाल्यास कांदा बाजारभाव आजचे पातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे.त्यामुळे निर्यात बंदी तत्काळ त्वरित हटविणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या