जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड-१९ व्यवस्थापन कक्ष

जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड-१९ व्यवस्थापन कक्ष

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहे. ही लढाई अधिक गतिमान करण्यासाठी करोना रुग्णांची ओळख, त्याच्यांवर तत्काळ उपचार, संशयितांसाठी योग्य ती खबरदारी तसेच शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करता यावी, यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड-१९ व्यवस्थापन कक्ष म्हणजेच इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (वॉर रुम) कार्यरत करून सज्जता वाढवण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या संकल्पनेतून ही वॉर रूम कार्यरत करण्यात आली आहे. राज्यासह देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी तसेच अडीचशेहून अधिक परदेशस्त नागरिक जिल्ह्यात येऊनही, करोनाचा प्रादुर्भाव होण्यास अद्याप नाशिक जिल्हा अपवाद ठरला आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे मोठे योगदान आहे. संशयितांची माहिती मिळताच या माहितीचे संकलन संबंधितांवर तातडीने उपचार व खबरदारी याबाबत आरोग्य विभागाने मोठी काळजी घेतल्याचे चित्र आहे. परंतु करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी अधिक सज्जता आवश्यक असल्याने या वॉर रूमची उभारणी केल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

करोनाबाबत शासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात असून नागरिकांनाही नियमावली आखून देण्यात येत आहे. तरीदेखील करोनाचा कहर थांबत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ४५ हून अधिक करोना संशयित रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांना करोनाची लागण नसल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले आहे. तरीदेखील जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण सापडल्यास किंवा करोनाची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (वॉर रुम) कार्यान्वित करण्यात आली आहे.

असे चालते कार्य
वॉर रुममध्ये तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज सुरू आहे. याचे नियंत्रण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे असून करोनाबाबत रुग्णांची माहिती संकलित करणे, परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांची नियमित तपासणी केल्याचा अहवाल गोळा करणे, करोनाची लागण झाली असल्यास करोनाबाधित रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात होता, याची माहिती गोळा करणे, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी संबंधीत यंत्रणांना आदेशित करणे, शासनाकडून आलेल्या आदेशांची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणासोबत संपर्क साधून त्यांना माहिती देणे आणि आदेशाची अंमलबजावणी करणे असे कामकाज या वॉर रुममधून सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com